केरळमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती, नायर सेवा समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पिंपळगाव कांदा व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने १० टन कांदा, दोन टन गव्हाचे पीठ यासह एकूण २३ टन साहित्य पाठविण्यात आले.

केरळच्या कायाकुलाम येथे हे साहित्य पाठविण्यात आल्याचे नायर सेवा सदनचे पार्थन पिल्ले, भारत भारतीचे नाशिकचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सांगितले. केरळमधील आपत्तीत मदत करण्यासाठी नाशिकमधून सामग्री देण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यास अनेक संस्था, संघटना, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

पिंपळगाव कांदा व्यापारी असोसिएशनने १० टन कांदा आणि दोन टन गव्हाचे पीठ देऊन मदत केली. त्र्यंबकेश्वर येथून दोन टन तांदूळ, पीठ, घरगुती किराणा साहित्य, साडय़ा देण्यात आल्या. त्यासोबत विविध अन्नसामग्री, औषधे, कपडे अशी एकूण २३ टन सामग्री नाशिक येथून रेल्वेने केरळला रवाना करण्यात आली. कुलवंत गुजराल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय कुलकर्णी, संजय चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याचे नियोजन करण्यात आले. त्यात पिल्ले, नारायण पन्नीकर, उषा राजन, पेशकार, भारत पटेल, राजेंद्र फड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे योगदान लाभले.