राज्यातील १५०० गावांची आणेवारी ५० पैश्यांहून कमी झाली असून सलग दुसऱ्या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली जात असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. घोटी ग्राम पालिका आणि जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन विभागातर्फे शेतकरी, औद्योगिक, संकरीत व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कृषीमालास चांगला भाव मिळावा म्हणून शासन प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रदर्शनात लाभ घेऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. या भागातील डांगी जातीच्या जनावरांची कष्ट करण्याची आणि प्रतिकूल वातावरणात काम करण्याची क्षमता चांगली आहे. या जातीवंत जनावरांच्या जतन व संवर्धनाचे मोठे काम स्थानिक शेतकरी करत आहे. दुष्काळी स्थितीमुळे घोटी-इगतपुरीच्या ग्रामीण भागात चारा, पाणी व विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष दिले जाईल. यासाठी बैठक घेऊन प्रशासनास योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या जातील, असे भुसे यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंवर्धन सभापती केदा आहेर यांनी प्रदर्शनास दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करून तीन लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
या प्रदर्शनासाठी ठाणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून शेतकरी मोठय़ा संख्येने जनावरे घेऊन येत आहेत. डांगी जनावरांबरोबर संकरीत गायी, म्हशी, बैल, घोडे आदी जनावरे आहेत.