नाशिक शहर परिसरात नशा आणणाऱ्या पदार्थांची विक्री होत असल्याने पोलिसांकडून याविरोधात कारवाईस सुरुवात झाली आहे. कॉलेजरोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत वेगवेगळ्या स्वादातील प्रतिबंधित निकोटीनयुक्त ८८ हजार रुपयांचे इलेक्ट्राॅनिक (इ) सिगारेटचे नऊ खोके पोलिसांनी जप्त केले.
हेही वाचा – जळगाव : मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
हेही वाचा – नाशिक : काँक्रिटीकरणामुळे रामकुंडातील अस्थिंचे अविघटन, देवांग जानी यांचा दावा
स्थानिक गुन्हे शाखेला एक जण प्रतिबंधित असलेली इलेक्ट्रॉनिक सिगारेट, निकोटीनयुक्त हुक्का विक्रीसाठी काॅलेजरोडवरील हॉलमार्क चौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात सर्वेश पाल (२८, रा. सातपूर), फैसल शेख (२८, रा. भाभानगर) हे सापडले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेली काळ्या रंगाची पिशवी तपासली असता वेगवेगळ्या स्वादाचे नऊ निकोटीनयुक्त इ सिगारेटचे खोके आढळले. सर्व साठा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत ८७ हजार ९०० रुपये इतकी असून, गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दोन्ही संशयितांना देण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.