नाशिकमध्ये मिसळ महोत्सवाची खवय्यांना उत्सुकता
‘मिसळ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र’ असा नाशिकला विशेष दर्जा देण्याची मागणी स्थानिक खवय्यांकडून पुढे येत असतांनाच नाशिकच्या मिसळीचे जोरदार विपणनदेखील आता सुरू झाले आहे. २० व २१ फेब्रुवारी रोजी नाशिक नगरीतील तमाम चटकदार मिसळींचा ‘मिसळ-सरमिसळ’ हा आगळा महोत्सव भरविण्यात येत आहे. राज्याच्या आद्य खाद्य संस्कृतीमध्ये मानाने मिळवणाऱ्या मिसळ परंपरेत नाशिकचा झेंडा रोवण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू झाले आहेत.
पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि जागोजागच्या मिसळ परंपरांनी आपले आपले स्थान तयार केले असले तरी नाशिकच्या झणझणीत पण तितक्याच चटकदार मिसळीचा तोरा काही वेगळाच असतो. एका भल्या मोठय़ा वाडग्यात लालबुंद रश्शाचा तवंग मिरवणारी खमंग र्ती, ऐसपैस ‘ट्रे’च्या प्लेटमध्ये जिभेला खुणावणारे चटपटीत मिश्रण, पापड, लिंबू, कांदा, मिरची आणि खास मिसळस्नेही पावाची लुसलुशीत लादी असा चवदार जामानिमा असलेली नाशिकची मिसळ हा कोणत्याही सुग्रास भोजनाएवढाच ऐटदार थाट असतो. त्यामुळे नाशिकला येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाची वा प्रवाश्याची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळीलाच असते. उत्तर-दक्षिणेकडील नाश्त्याच्या पदार्थानी महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत केलेला शिरकाव रोखण्याची ताकद असलेली मिसळ न चाखलेला माणूस महाराष्ट्रात आढळणार नाही हे खरे असले तरी अजूनही पंचतारांकित खाद्य परंपरेने मात्र मिसळीला दोन हात दूरच ठेवले आहे. ही प्रतिष्ठा मिसळीला मिळवून देण्यासाठी मिसळ महोत्सव यशस्वी ठरला तर ‘नाशिक ढोल’च्या तालावर नाशिकमध्ये मिसळीच्या मिरवणुकाही निघतील असे मिसळप्रेमी नाशिककर उत्साहाने सांगतात.
नाशिककरांचे मिसळप्रेम तसे अवर्णनीय. दर्दी खवय्य्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अफलातून उपक्रम सातत्याने सुरू असतात. अलीकडे सर्वाचे लक्ष वेधणाऱ्या चुलीवरच्या मिसळीला चांगलीच पसंती लाभली असताना आता निखाऱ्यावरच्या मिसळीचा सुगंध दरवळत आहे. शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थी असो, मित्रमंडळी वा कुटुंब असो, मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी सारे धडपडत असतात. वेगवेगळ्या मिसळीची चव चाखण्यासाठी विविध भागात विखुरलेल्या हॉटेल्समध्ये सर्वाची छोटेखानी सहल निघत असते.
‘विश्वास संकल्प आनंदाचा’ या उपक्रमातंर्गत २० व २१ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘मिसळ सरमिसळ’ महोत्सवात एकाच छताखाली वेगवेगळ्या मिसळींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गंगापूर रस्त्यावरील विश्वास लॉन्स येथे सकाळी आठ ते दुपारी तीन या कालावधीत हा महोत्सव होईल.
त्यात नाशिककरांच्या आवडत्या तुषार मिसळ, कमला-विजय, भामरे, नानाज् कॅफे, गजानन, समृद्धी, साधना, सप्तशृंगी, करी लिव्हज्, एस. आर. केटर्स, भगवती, कुलकर्णी मिसळ आदींचा समावेश आहे. मिसळीबरोबर टपरीवरचा चहा, टी पोस्ट, कढीभेळ, ताक व मठ्ठा, बुधा हलवाई यांची जिलेबी, सुदाम्याचा फाफडा, तारा पान असा सारा बेत प्रथमच जुळून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A misal festival in nashik
First published on: 18-02-2016 at 01:46 IST