scorecardresearch

सिन्नरच्या अपहृत बालकाची संशयितांकडून सुटका; पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात

सिन्नर शहरातून अपहरण झालेल्या ११ वर्षाच्या चिराग कलंत्री या बालकास संशयितांनी सहा तासानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा त्याच परिसरात सोडून दिले.

सिन्नरच्या अपहृत बालकाची संशयितांकडून सुटका; पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात

नाशिक : सिन्नर शहरातून अपहरण झालेल्या ११ वर्षाच्या चिराग कलंत्री या बालकास संशयितांनी सहा तासानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा त्याच परिसरात सोडून दिले. अपहृत बालक सुखरुप असून या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रथमदर्शनी पैश्यांसाठी हे अपहरण झाल्याचा संशय आहे.

गुरूवारी रात्री आठ वाजता सिन्नर शहरातील काळेवाड्याजवळ अपहरणाची ही घटना घडली होती. चिराग घराजवळ मित्रांसमवेत खेळत होता. पांढऱ्या रंगाच्या मारूती ओम्नी वाहनातून आलेल्या संशयितांनी त्याचे अपहरण केले. या वाहनावर क्रमांक नव्हता. मित्रांनी ही बाब कुटुंबियांना सांगितल्यावर हा प्रकार उघड झाला. चिरागचे वडील तुषार कलंत्री व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चिराग हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. सिन्नर बाजारातील आडत व्यापारी सुरेश कलंत्री यांचा तो नातू आहे. बालकाच्या अपहरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन अपर जिल्हा अधीक्षक माधुरी कांगणे या सिन्नरला दाखल झाल्या. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.

परिसरातील सीसी टीव्हीच्या आधारे संशयितांच्या वाहनाचा माग काढण्याचे प्रयत्न झाले. महामार्गांवर नजर ठेवली गेली. दरम्यानच्या काळात कलंत्री यांच्या मित्र परिवाराने समाजमाध्यमांवरून अपहृत बालकाचे छायाचित्र व मारूती ओम्नीची माहिती प्रसारीत करून ही गाडी कुठे दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. या घडामोडी दरम्यान शुक्रवारी पहाटे दोन वाजता अपहृत चिरागला संशयितांनी सिन्नर शहरात पुन्हा सोडून देत पळ काढला. या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित सिन्नरमधील असून पैश्यांसाठी हे अपहरण झाल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या