आमदार दिलीप बोरसे यांचा इशारा

नाशिक : सटाणा तालुक्यातील सटाणा ते नामपूर आणि ताहाराबाद ते अंबासन या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानभवनच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार दिलीप बोरसे यांनी दिला. तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी बोरसे यांनी कळवण, सटाणा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बोरसे यांनी उपरोक्त इशारा दिला.

या बैठकीस कळवण विभागाचे उपअभियंता संजय मोरे, उपअभियंता अशोक िशदे, सहाय्यक अभियंतावर्ग उपस्थित होता. सटाणा ते नामपूर रस्त्याच्या संथगतीने सुरू असलेल्या कामावरून बोरसे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रस्त्याची अक्षरश: वाट लागली असून या खराब रस्त्यामुळे अनेक बळी गेले तर काही अपंग झाले आहेत. दोन दिवसांत डांबराने  रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच हरकती असलेल्या जागा सोडून कामाला सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली.

चिराई -टेंभे, काकडगाव-अंबासन या मालेगाव हद्दीपर्यंत तसेच जायखेडा -ब्राम्हणपाडा-आसखेडा-द्याने – नामपूर रस्ता दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी, ग्रामीण भागातील ज्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे तेथील कामांनाही तातडीने सुरुवात करावी, असेही त्यांनी सांगितले.

हरकतींमुळे काम अडकले

सटाणा ते नामपूर रस्त्याला ४० जणांनी हरकती घेतल्या आहेत. यात नामपूर -खिरमाणी -कुपखेडा या पाच किलोमीटर रस्त्याच्या कामाला ३४ जमीन धारकांनी न्यायालयात जाऊन भरपाईसाठी हरकत घेतली आहे. उर्वरित चौगाव रस्त्यावर ठिकठिकाणी हरकती घेण्यात आल्या आहेत. न्यायालयाने १० मीटर रुंदीच्या रस्त्याला हरकत घेतली असून त्यामुळे रस्त्याचे काम दीड वर्षांपासून रखडले आहे. हे काम आता कळवण विभागाला जोडण्यात आले असून या रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामासोबतच रस्त्याच्या उर्वरित कामाला सुरुवात करण्यात येईल, असे मालेगावचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश देवरे यांनी स्पष्ट केले. पूरहानीतील पुलांची कामे आणि दुरुस्तीच्या कामांना दोन दिवसात गती देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.