लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे शिंदे वस्तीवर मादी बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. या परिसरात जेरबंद झालेला हा पाचवा बिबट्या आहे.

सध्या हिवाळा सुरू असल्याने परिसरात पिके काढण्याचे काम चालू आहे. शेतांमधील आश्रयाची ठिकाणे पिके काढणीमुळे उघड्यावर येत असल्याने बिबटे स्थलांतर करत असतात. अशावेळी ते नागरी वस्तीकडे येतात. अनेक दिवसांपासून नायगाव शिवारात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सायंकाळनंतर बाहेर पडताना शेतकरी घाबरू लागले आहेत. शेतातूनही सायंकाळच्या आत शेतकरी गावाकडे परतू लागले आहेत.

आणखी वाचा-कंस मामाला लाजवेल असा निर्दयीपणा, धुळ्यात पिंपात बुडवून चार वर्षाच्या बालकाला मारले

बिबट्याला अडकविण्यासाठी नागरिकांच्या मागणीनंतर वन विभागाने पिंजरा लावला होता. गोपाळा शिंदे यांच्या शेळीसह बोकड बिबट्याने फस्त केले होते. त्यानंतर शिंदे वस्तीतील भाऊसाहेब शिंदे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्री या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रोहित लोणारे, निखिल जाधव, रवी जाधव, माजी सैनिक संजय गीते यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, नायगाव शिवारातून हा पाचवा बिबट्या वन विभागाने ताब्यात घेतला आहे. बिबट्या मादी असून साधारणत: आठ वर्षाचा आहे. बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another leopard caught in naigaon area mrj