हवामानाची मागील वर्षांची पुनरावृत्ती; द्राक्षबागा धोक्यात
मागील वर्षांप्रमाणेच नाशिक जिल्ह्य़ात निसर्गाकडून कित्ता गिरवला जात असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला असून असाच पाऊस यापुढे काही दिवस कायम राहिल्यास द्राक्षबागांवर पुन्हा एकदा अरिष्ठ कोसळण्याची भीती आहे. तीन दिवसांपासून कोसळणारा पाऊस हा मुख्यत: सायंकाळी व रात्री पडत असल्याने द्राक्षासह इतर फळ पिकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. निसर्ग कोपल्यानंतर होणाऱ्या नुकसानीतून सावरण्यास शासनाकडून विशेष मदत होत नसल्याचा अनुभवही जिल्ह्य़ातील द्राक्ष उत्पादकांनी घेतला आहे. मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्षबागा तसेच इतर पिकांचे नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेल्या अनेक मागण्या आजवर मंजूर झालेल्या नसल्याचे शल्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक भागीदारीअंतर्गत संघाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या ३० प्रस्तावांपैकी केवळ तीन मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
ढगाळ वातावरण आणि वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या जनतेला मागील तीन दिवस कोसळलेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी उष्णता आणि रात्री गारवा या दुहेरी खेळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. द्राक्ष, कांदा, टोमॅटो, भुईमूग, भात यांसह अन्य नगदी पिकांना याचा फटका बसल्याचे आताच जाणवत आहे. टोमॅटोला करप्या रोगाचा तर द्राक्षबागांना फळ कुजणे, फळ गळणे, यांसह इतर रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. पावसाचे आगमन सायंकाळच्या सुमारास होत असल्याने पावसाचे पाणी फुलावर आलेल्या बागांसाठी अडचणीचे ठरत आहे. रात्रभर पाणी त्यात साचल्याने फळ कुजणे, फळ गळणे यांसह पाणी उतरलेल्या द्राक्षमण्यांना तडा जात असल्याने बुरशीजन्य रोग निर्माण होत आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक बबन भालेराव यांनी सांगितले. ज्या द्राक्षबागांची छाटणी ६ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत झाली आहे त्यांना फळकूज, फळगळ असा फटका बसण्याची भीतीही भालेराव यांनी व्यक्त केली.
बेमोसमी पावसाने गेल्या वर्षीही ऐन द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. सध्याचे हवामान पाहता तीच परिस्थिती निर्माण होईल की काय, अशी भीती द्राक्ष उत्पादकांना आहे. मागील वर्षी जिल्ह्य़ातून ३७०० कण्टेनर म्हणजे ४४४०० क्विंटल द्राक्ष निर्यात झाली होती, हवामानाने दगा दिला नसता तर निर्यात यापेक्षा अधिक झाली असती. ६ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत छाटणी झालेल्या बहुतांश बागांची द्राक्षे निर्यातक्षम असतात. त्यांना या बदललेल्या हवामानाचा फटका बसणार असल्याचे मत द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष माणिक पाटील यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. द्राक्षमण्यांना तडे गेल्याने त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवणार आहे. १५ ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत छाटणी झालेल्या बागांमधील द्राक्षमणींना तडे जाण्याचा प्रकार अधिक आहे. ज्या शेतकऱ्यांची द्राक्षे विक्री योग्य असतील त्यांनी ती विनाविलंब विक्रीस काढावीत, असा सल्लाही पाटील यांनी दिला. गेल्या वर्षी बेमोसमी पावसाचा फटका बसून शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्या वेळी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी उपाय सुचविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मांडण्यात आलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करूनदेखील त्या मंजूर झाल्या नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. द्राक्ष बागायतदार संघाने फळविमा काढण्यासंदर्भात शासकीय आदेश काढण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परंतु अद्यापही मागणी दुर्लक्षित आहे. ती मागणी मान्य झाली असती तर ८० टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला असता. गतवर्षी द्राक्ष पीक विमाअंतर्गत महाराष्ट्रातील चार विभागांत ११ कोटी रुपयांचे वाटप झाले होते. आंबे वरखेडा या दिंडोरी तालुक्यातील गावात ४४००० रुपये प्रति हेक्टर भरपाई या योजनेखाली दिले गेले होते, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा हवेतच
सध्या असलेले वातावरण पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याने दव व धुक्यामुळे डावण्यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवणार आहे. सार्वजनिक भागीदारीअंतर्गत गेल्या वर्षी शासनाकडे द्राक्ष बागायतदार संघाने ३० प्रस्ताव दाखल केले होते. पैकी केवळ तीन मंजूर झाले. अद्याप २७ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. १०० एकर द्राक्ष उत्पादकांचा गट तयार करून अद्ययावत यंत्रणेची मागणी शासनाकडे केल्यास शासकीय ५० टक्के निधी व उर्वरित निधी शेतकऱ्यांकडून जमा करून यंत्रणा विदेशातून मागविली जाते. परंतु शासनाकडून लाभार्थ्यांना अद्याप ही यंत्रणा मिळू शकलेली नाही. शासनाकडून अपेक्षा करूनही मदत मिळत नाही. गेल्या वर्षी द्राक्ष पिकांचा गारपिटीपासून बचाव होण्यासाठी शेडनेट खरेदीसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ती घोषणा अजूनही वाऱ्यावरच आहे.
– माणिक पाटील, विभागीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष