नाशिक : आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांच्या गरजांची पूर्तता, अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आसाम रायफल्स महासंचालनालयाने नाशिक येथे राज्यातील पहिले आसाम रायफल्स माजी सैनिक संघटना केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्रामार्फत दलातून निवृत्त होणाऱ्या सैनिकांना आरोग्य सेवा सहाय्य, व्यावसायिक शिक्षण, समुपदेशन आणि विविध कल्याणकारी सुविधा देण्याचे काम केले जाणार असल्याचे आसाम रायफल्सचे महानिर्देशक लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांनी सांगितले.

रविवारी येथे तोफखाना केंद्रातील तोपची सभागृहात आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी आसाम रायफल्स माजी सैनिक संघटना केंद्राचे उद्घाटन नायर यांच्या हस्ते करण्यात आले. आसाम रायफल्समध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. नाशिक येथील केंद्र महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांत वास्तव्यास असणाऱ्या आसाम रायफल्सचे एक हजारहून अधिक माजी सैनिक आणि वीर नारींची मदत व गरजांची पूर्तता करेल, असे यावेळी सांगण्यात आले. मेळाव्यात २५० हून अधिक माजी सैनिक, वीर नारी व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. माजी सैनिकांशी लेफ्टनंट जनरल नायर यांनी संवाद साधला.

हेही वाचा…दिंडोरीत माकपच्या भूमिकेत बदल, जागा न सोडल्यास उमेदवारीची तयारी

२३ मार्च २०२४ रोजी साजरा करण्यात आलेल्या पहिल्या आसाम रायफल्स माजी सैनिक दिनानंतर आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांनी संपर्क साधण्यात सुलभता यावी, या हेतूने आसाम रायफल्सने माजी सैनिक संघटनेच्या सोबतीने येथे नवीन आसाम रायफल्स माजी सैनिक संघटना केंद्राची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील हे पहिले केंद्र आहे. हे केंद्र राज्यातील आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांना कल्याणकारी सुविधा आणि सहाय्य सेवा देण्यासाठी समर्पित असेल. माजी सैनिकांची निवृत्तीपश्चात काळजी आणि त्यांना आवश्यक ती मदत देणे, हे या केंद्राचे उद्दिष्ट असल्याचे आसाम रायफल्सने म्हटले आहे.

हेही वाचा…नाशिकमध्ये वंचितकडून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मैदानात, औपचारिक घोषणा बाकी

कल्याणकारी योजनांची माहिती

कार्यक्रमात माजी सैनिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना आणि आर्थिक मदतीची माहिती देण्यात आली. त्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीदरम्यान एकाच वेळी १२ हजार रुपये, सैनिकांच्या विधवांना त्यांच्या दोन मुलींच्या लग्नासाठी २० हजार रुपयांची मदत, वैद्यकीय मदत म्हणून माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा यांना ९० हजार रुपये, पाल्यांच्या शिक्षणासाठी इयत्ता अकरावी ते बारावीसाठी वार्षिक पाच हजार रुपये मदत. उच्च शिक्षण अनुदान केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (एम टेक, एमबीए, बीटेक, एमबीबीएस, बीडीएस आणि तत्सम अभ्यासक्रम) प्रतिवर्षी १० हजार रुपये मदतीचा समावेश आहे.