परतीच्या पावसामुळे सर्वच पिके बाधित होऊन शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या अर्ली द्राक्ष पिकाला विमा लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पणन, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
पावसामुळे जिल्ह्य़ातील द्राक्ष बागांचे ७० टक्के नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यात द्राक्ष, डाळिंबासह खरीप पिकांसह भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यांची पाहणी शुक्रवारी खोत यांनी केली. या वेळी आमदार दिलीप बोरसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे आदी उपस्थित होते. खोत यांनी सावकी, ठेंगोडा, वनोली, वीरगाव, करंजाड, पिंगळवाडे, भुयाणे, निताने, बिजोटे, द्याने येथे भेट देऊन पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी पिकांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी केली.
दौऱ्यात बहुतांश शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्ष पिकाला विमा कवच द्यावे तसेच बागेत अस्तरीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक कागदाला अनुदान, पीक कर्ज माफी आदी मागण्या मांडल्या.
अर्ली द्राक्ष पिकविणारा बागलाण हा एकमेव टापू देशाला कोटय़वधीचे परकीय चलन मिळून देतो. या पिकाला आणि पिकविणाऱ्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रथम या पिकाला विमा कवच देण्यासाठी आणि या पिकाचा रोजगार हमी योजनेत समावेश करण्यासाठी तत्काळ केंद्र सरकारकडे त्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. आमदार बोरसे यांनी जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी, घरांचे लिलाव होत असल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान कर्जाला कंटाळून आत्महत्या करणारे वायगाव येथील शेतकरी केदा देवरे (६०) यांच्या घरी भेट देऊन खोत यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना तात्काळ मदत देण्याची सूचना केली.
बागलाणमधील ९० टक्के द्राक्ष पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून अन्य बाधित पिके, उर्वरित द्राक्ष, डाळिंबाचे पाच नोव्हेंबपर्यंत पंचनामे पूर्ण करावेत. या कामात कोणी दिरंगाई केल्यास त्यांना तत्काळ निलंबित केले जाईल. सक्तीची वीज देयक आणि कर्ज वसुलीला तत्काळ स्थगिती देण्यात येईल. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज पुनर्गठन केले जाईल.
– सदाभाऊ खोत (फलोत्पादन राज्यमंत्री)