ज्या क्रीडाप्रकारांमध्ये शारीरिक संघर्षांचे स्वरूप अधिक पाहावयास मिळते, अशा प्रकारात खेळाडू दुखापतग्रस्त होण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे फुटबॉल, रग्वी, बास्केटबॉल, हॉकी, बॉक्सिंग, कराटे यांसह कबड्डी, कुस्ती या खेळांमध्ये संघासोबत फिजिओथेरेपिस्ट आवश्यक आहे, परंतु, नाशिकमध्ये त्यासंदर्भात अधिक जागृतीची आवश्यकता आहे, अशी भूमिका येथील युवा फिजिओथेरेपिस्ट डॉ. सोनम जेठवा यांनी मांडली आहे.
सोनम या मागील तीन-चार वर्षांपासून येथे स्थायिक झाल्या असून या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्राटासह स्थानिक क्रीडापटूंना चांगल्यापैकी होत आहे. मागील वर्षी नाशिक दौऱ्यावर आलेल्या थायलंड या संघाबरोबर स्थानिक कबड्डी संघाचे सामने झाले. पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात रंगलेल्या या सामन्यावेळी स्थानिक खेळाडूंच्या दुखापतीचे काही प्रकार घडले. त्यावेळी सोनम या संघासमवेत असल्याने मैदानावरच खेळाडुंच्या दुखापतीचे निदान होऊन खेळाडुला विश्रांती द्यावयाची की खेळू द्यायचे, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येत होता. संघाच्या एकंदरीत कामगिरीवरही त्याचा सकारात्मक निर्णय दिसून आला. त्यांमुळेच स्थानिक कबड्डी संघाशी त्यांचे नाते जडले आहे.
२००८ मध्ये मुंबई येथे फिजिओ केअर म्हणून सेवा सुरू करणाऱ्या सोनम यांनी २०११ मध्ये ऑस्ट्रेलियातील बेस्ट अ‍ॅडलेड फुटबॉल क्लबच्या फिजिओ केअर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. सॉकर आणि रग्बी यांचे मिश्रण असलेल्या ऑस्ट्रेलियन फुटबॉलमध्ये खेळाडुंच्या दुखापतींचे प्रमाण अधिक असते. डोक्याला मार लागणे, गुडघ्याला दुखापत होणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने अशा दुखापतींची पाहणी करून त्वरीत निर्णय घेणे आवश्यक असते. खेळाच्या लयीत असल्याने खेळाडू आपल्या दुखापतीविषयी फारसे गंभीर नसतात. परंतु दुखापतीची वेळीच पाहणी न केल्यास ते त्यांच्या कारकिर्दीसाठी धोकादायक ठरू शकते, असे निरीक्षण सोनम यांनी नोंदविले आहे.
ऑस्ट्रेेलियात सायंकाळी पाचच्या सुमारास सामना असल्यास खेळाडुंच्या शारीरिक तंदुरूस्तीची तपासणी दुपारी दोनपासूनच सुरू होते. चर्चेव्दारे त्यांची मानसिकता बदलण्याचे कामही केले जाते. विशेष म्हणजे सामना संपल्यानंतरही खेळाडूंकडून व्यायाम करून घेतला जातो. नाशिकच्या बास्केटबॉलपटूंना तर संघासमवेत फिजिओ केअरची आवश्यकता असते, याची कल्पनाही नसल्याचे सोनम यांच्या लक्षात आले. फिजिओथेरेपिस्टला केवळ फिजिओ केअर म्हणून नव्हे तर, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनही काम करावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विदेशातून भारतात परतण्याचा निर्णय झाल्यावर सोनम यांच्यापुढे अनेक पर्याय होते. मुंबईतील एका फुटबॉल क्लबने त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. परंतु आई-वडील नाशिकला असल्याने सोनम यांनी येथेच कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. २०१३ पासून त्या नाशिक येथेच स्थायिक असून कबड्डीपटू प्रसाद सूर्यवंशी, सारिका जगताप यांसह अनेक खेळाडूंना त्यांच्या उपचाराचा लाभ झाला आहे.