महाविकास आघाडीची सत्ता येऊन अडीच वर्षे झाली तरी मनोमीलन नाही; आरोप-प्रत्यारोपांपासून काँग्रेस दूर, शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी
अविनाश पाटील
नाशिक : केंद्रातील सत्तेचे पाठबळ असलेल्या भाजपविरोधात लढण्यासाठी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांची महाविकास आघाडी तयार होऊन अडीच वर्षांचा कालावधी झाला असला तरी अजूनही त्यांच्यात मनोमीलन झालेले नसल्याचे वेगवेगळय़ा घटनांवरुन सातत्याने दिसून येते. अशा घटनांपासून उत्तर महाराष्ट्रही अलिप्त राहू शकलेला नाही. विशेष म्हणजे आरोप-प्रत्यारोपाच्या या राजकारणापासून काँग्रेस दूर असून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात नाराजीची तार छेडली आहे. त्यास नाशिक जिल्ह्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा आणि जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात होणाऱ्या भेटीगाठी या घटना कारणीभूत ठरल्या आहेत.
काय घडले ? काय बिघडले ?
उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचा अधिक प्रभाव आहे. राज्यातील सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी सहभागी असल्याने दोनही पक्षांमध्ये पूर्वी होणाऱ्या वाद-विवादाचे प्रमाण कमी झाले असले तरी संधी मिळताच एकमेकांवर कुरघोडी करण्याचे ते टाळत नाहीत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यांचा दौरा केला. या तालुक्यांमधील काही टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन त्यांनी पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजनही केले. दौऱ्यात त्यांच्यासोबत अर्थातच जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर सोबत असताना राष्ट्रवादीला दूर ठेवण्यात आले होते. आदित्य हे दौरा आटोपून निघून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. दौऱ्यात विकास कामांचे जे फलक लावण्यात आले, ते काम याआधीच सुरू झालेले असून शिवसेनेच्या नेत्यांकडून हे काम आपणच करीत असल्याचे भासविले जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. आदित्य ठाकरेंची यात कोणतीही चूक नसून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडूनच त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे भुजबळांच्या या आरोपांना शिवसेनेकडून कोणतेही उत्तर दिले गेलेले नाही. शिवसेनेविषयी कायमच संयमी भूमिका घेणाऱ्या भुजबळांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर प्रथमच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांविरोधात उघडपणे आरोप केले.
नाशिक जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संबंधात या प्रकरणाने काहीसा तणाव निर्माण झाला असताना जळगाव जिल्ह्यात मात्र या दोनही पक्षांच्या संबंधात बिघाडीचे काम करण्यात भाजपचा नकळत का होईना, हातभार लागला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संबंध कसे आहेत, हे नव्याने सांगावयास नको. त्यामुळेच महाजन यांच्याबरोबर शिवसेनेचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी चहा घेणे, जेवण करणे या गोष्टी खडसे यांच्यासाठी अजीर्ण आहेत. आपला संताप खडसे यांनी मुक्ताईनगरातील एका कार्यक्रमात जाहीरपणे व्यक्त केला. मुंबईतील जाहीर सभेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केल्यानंतर महाजन यांनी
शिवसेना हा सत्तालंपट पक्ष असून या पक्षाची भाजपशी तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शिवसेनेची अवस्था ही गटारातील बेडकासारखी असल्याची टीकाही त्यांनी केली होती. महाजन अशी टीका करत असताना शिवसेनेचे नेते त्यांना उत्तर का देत नाही, हा खडसे यांचा प्रश्न आहे. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेने महाजनांना आपण बेडूक नव्हे तर, हत्ती असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन केले होते. खडसे यांच्या या आवाहनाला शिवसेनेच्या नेत्यांकडून अद्यापही उत्तर दिले गेले नसल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.
संभाव्य राजकीय परिणाम
नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होणार असून या निवडणुकीस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे जाण्याची चर्चा होत असताना आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात घडलेल्या घडामोडींवरुन भुजबळ यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर केलेले आरोप या चर्चेत बिब्बा घालू शकतात. पुढील राजकारणातही एकमेकांच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. भाजपलाही ही गोष्ट पूरकच ठरू शकते. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपच्या नाकीनऊ येऊ शकते, हे महापालिकेतील सत्ताकारणाने दाखवून दिले आहे. महाजनांना शिवसेनेचे नेते प्रत्युत्तर का देत नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही पक्षांचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्यात अडकणे भाजपसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.