शहरी भागात वाढलेली सिमेंटचे जंगल, गगनचुंबी इमारती, जल व ध्वनी प्रदूषण. अशा विविध कारणास्तव परिसरातून पक्ष्यांचे स्थलांतर होत असून ते डोंगर परिसर व डेरेदार वृक्षांवर विसाव्यास गेल्याचे पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे इमारतीच्या गच्चीत व इतर भागात वास्तव्य करणाऱ्या पारव्यांची संख्या वाढत असून ही बाब इतर पक्ष्यांसाठी घातक आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणाची पातळी उंचावल्याने ‘पोंड हेरॉन’ प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या वाढली. स्वच्छ पाण्यात वास्तव्य करणारे ‘किंगफिशर’ मात्र कमी झाले आहे. ‘नेचर क्लब ऑफ नाशिक’च्यावतीने आयोजित ‘चला पक्षी बघूया..’ या उपक्रमात हे विदारक चित्र समोर आले.

महिनाभर चाललेल्या पाहणीत घारपुरे घाटावरील पोपटाचे झाड, पोस्ट ऑफिस जवळील घारींचे वास्तव्य ठिकाणे, गाडगे महाराज धर्मशाळेतील बगळ्यांची कॉलनी, पीटीसी व गंगा घाटाजवळील साळुंकीची कॉलनी, सामाजिक वनीकरण रोपवाटिकेजवळील सस्तन प्राणी व वटवाघळांची वस्ती, रामवाडी पुलाजवळील पानकावळ्यांचे वास्तव्य असणाऱ्या परिसरातून पक्ष्यांनी या वर्षी स्थलांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली. हे पक्षी कुठे गेले, याचा शोध घेतला असता पांडवलेणी परिसरातील औद्योगिक वसाहतीत डेरेदार वृक्षांवर त्यांनी आपली घरटी तयार केली आहेत. शहरात निर्माण होणारे सिमेंटचे जंगल. चाळी, वाडे जाऊन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहे. वृक्षांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. यामुळे हे स्थलांतर होत असल्याचे अभ्यासात पुढे आले.

गोदावरी नदी पात्रात पोंड हेरॉन या पक्ष्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात दिसून आली. या पक्ष्यांची संख्या वाढली की नदीतील प्रदूषण वाढले समजायचे. स्वच्छ पाण्यात राहणाऱ्या किंगफिशरची संख्या कमी झाली असून ‘नाईट हेरॉन’ हा पक्षी गाडगे महाराज धर्मशाळे जवळील वृक्षांवर घरटे बनविताना दिसून आला. रामकुंडाजवळ कावळ्यांनी घरटी बांधल्याचे दिसून आले. अमरधाम पुलाजवळील मोठय़ा वीज मनोऱ्यावर घारीने घरटे केले आहे. नदीपात्रात प्रचंड घाण असून ती तातडीने न काढल्यास त्याचा शहरवासीयांच्या आरोग्यावर परिणाम होईल. रुंग्ठा हायस्कूल, अभिनव विद्या मंदिर, सारडा विद्यालयाजवळ शेकडो चिमण्या दिसून आल्या. रुंग्ठा हायस्कूलमध्ये एकाच वेळी पाचशे चिमण्या बघावयास मिळाल्या. पतंगोत्सवात वापरला गेलेला नायलॉन मांजा ठिकठिकाणी लटकलेला दिसून आला. पक्ष्यांसाठी ही बाब हानिकारक असल्याने महापालिकेने मांजा हटाव मोहीम राबविणे आवश्यक आहे. महात्मानगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एका इमारतीतील भिंतीच्या पोकळीत पोपटांनी घरटी बनविल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा, भीमराव राजोळे, रवींद्र वामनाचार्य, उमेशकुमार नागरे, मनोज वाघमारे, आशीष जाधव, प्रमिला पाटील यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

कबुतरांची वाढती संख्या घातक

वाढत्या शहरीकरणामुळे पक्षी स्थलांतरित होत असताना दुसरीकडे सिमेंटचे जंगल पारवे (कबुतर) यांना जणू वरदान ठरत आहे. यामुळे शहरात त्यांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून आले. ही संख्या इतर पक्ष्यांसाठी घातक ठरू शकते. सद्य:स्थितीत शहरात दहा ते पंधरा हजार कबूतर असण्याचा अंदाज आहे. नवीन इमारतीमध्ये ते स्वत:ला सामावून घेत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. यासाठी लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक असल्याकडे पक्षीमित्रांनी लक्ष वेधले आहे.