शहर सुधार, विधी, आरोग्य समितीवर सदस्य नियुक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेत पुनस्र्थापित करण्यात आलेल्या शहर सुधार, विधी व आरोग्य समित्यांवरील सदस्य नियुक्तीला आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध धुडकावत सत्ताधारी भाजपने तीनही समित्यांवर तौलानिक बळानुसार एकूण

२७ सदस्यांची नियुक्ती जाहीर  केली. भाजपला सहकार्याची भूमिका घेणाऱ्या मनसेला त्याचे फळ या निमित्ताने पदरात पडले. ऐन वेळी मनसेच्या तीन सदस्यांची नियुक्ती करीत भाजपने विरोधकांना कात्रजचा घाट दाखविला. शिवसेनेने या समित्यांवर आपल्या सदस्यांची वर्णी लावली आहे.

गतवेळच्या तहकूब सर्वसाधारण सभेचे कामकाज शुक्रवारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. पुनस्र्थापित केलेल्या समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती सत्ताधारी-विरोधकांमधील वादविवादाअंती अखेरीस झाली. वृक्ष प्राधिकरण व जैवविविधता समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार महापौरांना देण्यात आला.

शहर सुधार, विधी व आरोग्य समितीवरील सदस्य नियुक्तीच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. समित्यांवरील नियुक्तीला कोणाचा विरोध नाही. परंतु, ही प्रक्रिया कायदेशीरदृष्टय़ा आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून पार पाडावी, अशी मागणी सदस्यांनी केली. आर्थिक स्थिती, जागा व मनुष्यबळाची कमतरता ही कारणे दाखवून पालिकेने प्रभाग समित्यांची संख्या सहापर्यंत सीमित ठेवली. तदर्थ समित्यांवर सदस्य नेमण्याआधी समितीची कार्यकक्षा, अधिकार व कर्तव्य, नियमावली याबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नसल्याचा आरोप गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील, गुरुमित बग्गा आदींनी केला. त्यासाठी संबंधितांनी कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. शासनाची मान्यता न घेता कायद्याचे उल्लंघन करून निर्मिल्या जाणाऱ्या समित्यांमुळे सर्वसाधारण सभेच्या अधिकारावर गदा येण्याची धास्ती व्यक्त करण्यात आली.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपचे सदस्य मैदानात उतरले. संभाजी मोरूस्कर यांनी विरोधकांना विश्वासात घेऊन याबाबतचा ठराव मंजूर झाल्याचे सांगितले. शिवाजी गांगुर्डे यांनी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य उपरोक्त समित्यांबाबत प्रश्न उपस्थित करीत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत असल्याचा टोला लगावला. भाजपचे नगरसेवक उद्धव निमसे यांनी समित्यांच्या कायदेशीर वैधतेबाबत चर्चा करणाऱ्यांवर खास शैलीत टोलेबाजी केली. या वेळी त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी राष्ट्रवादी व काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले. त्यांनी गोंधळ घालत त्यांचे बोलणे थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु निमसेंनी कोणालाही न जुमानता आपली टोलेबाजी सुरूच ठेवली. या घडामोडीत मनसेने तटस्थतेची स्वीकारलेली भूमिका त्यांच्या पथ्यावर पडली. सर्वाचे म्हणणे जाणून घेत महापौरांनी शहर सुधार, विधी व आरोग्य समित्यांसाठी तौलनिक बळानुसार सदस्यांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. या तिन्ही समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीमार्फत एक सदस्याला स्थान मिळणार होते. परंतु, त्यांनी आपल्या सदस्यांची नावे दिली नाहीत. हे लक्षात घेऊन भानसी यांनी मनसेच्या तीन सदस्यांना प्रत्येक समितीत समाविष्ट केले जात असल्याचे जाहीर केले.

शहर सुधार समिती

भाजपच्या स्वाती भामरे, पंडित आवारे, रुची कुंभारकर, भगवान दोंदे व सुदाम नागरे. शिवसेनेचे सत्यभामा गाडेकर, चंद्रकांत खोडे, सुवर्णा मटाले. मनसेच्या सुरेखा भोसले.

वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समिती

भाजपचे सतीश कुलकर्णी, अंबादास पगारे, रुपाली निकुळे, शांता हिरे, छाया देवांग. शिवसेनेचे किरण गामणे, हर्षदा गायकर व रंजना बोराडे तर मनसेचे योगेश शेवरे.

विधि समिती

भाजपचे शीतल माळोदे, शरद मोरे, हिमगौरी आहेर, नीलेश ठाकरे व राकेश दोंदे. शिवसेनेच्या पूनम गांगुर्डे, संतोष गायकवाड, मनसेचे सलीम शेख.

सभागृह नेतेपदी दिनकर पाटील

सर्वसाधारण सभेत सभागृह नेतेपदी भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर महापौरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp appointed 3 mns members in different committees of nmc
First published on: 27-05-2017 at 03:02 IST