नंदुरबार – जिल्ह्यात सरदार सरोवराशेजारील गावांना वैद्यकीय सेवा देणारी सुमारे पावणेदोन कोटींची बोट ॲम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) शनिवारी रात्री सरोवरात बुडाली. बोटीवर कोणीही नसल्याचे सांगण्यात येत असून बोटीचा काही भाग अजून पाण्याबाहेर असल्याने तिला वाचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत.नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवरामुळे जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील अनेक गावे बुडीताखाली गेली आहेत. शिल्लक राहिलेल्या गावांपर्यंत पोहचण्यासाठी पावसाळ्यात कसरत करावी लागते. नर्मदा काठावरील गावांच्या आरोग्य सेवेसाठी शासनाने याठिकाणी बोट रुग्णवाहिका तैनात केली आहे. याआधी चार ते पाच तरंगते दवाखाने होते.
युरोपियन आयोगाने दिलेल्या या तरंगत्या दवाखान्यांवर अनेक वर्ष परिसरातील आरोग्य व्यवस्था अवलंबून होती. आरोग्य सेवेला गती मिळावी, यासाठी वर्षभरापूर्वी याठिकाणी बोट रुग्णवाहिका देण्यात आली. सामाजिक दायित्व निधीतून देण्यात आलेली ही रुग्णवाहिका अवघ्या काही वेळातच एका गावातून दुसऱ्या गावापर्यंतचे अंतर कापत असल्याने आरोग्य सेवेला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. शनिवारी रात्री सरोवराच्या कडेला उभ्या असलेल्या बोट रुग्णवाहिकेत अचानक पाणी शिरुन ती निम्म्यापेक्षा अधिक बुडाली. पाण्यावर दिसणाऱ्या भागाला दोरीच्या सहाय्याने बांधून वाचविण्याचे प्रयत्न आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले. रात्री पाणी वाढल्याने ते बोटीत शिरल्याचा दावा आरोग्य प्रशासनाकडून केला जात आहे. दुसरीकडे, या रुग्णवाहिकेच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने बोटीत खालून पाणी शिरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या घटनेसंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असता, तोपर्यंत त्यांनाही बोट रुग्णवाहिका बुडाल्याची माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळेच रात्री झालेल्या या घटनेची माहिती न देण्यामागे नेमका काय हेतू, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या बोट रुग्णवाहिकेत दिवसातून तीन वेळा वेगवेगळे चालक आणि सहायक तैनात असतात. मग बोट बुडाली तेव्हा ते कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे हे तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. बोट रुग्णवाहिका बुडाल्याने याठिकाणी पावसाळ्यात आवश्यक असलेल्या रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बोट रुग्णवाहिका बुडालेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या राजपिपला या गावातून क्रेन मागवून बोट बाहेर काढण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.- डाॅ. रवींद्र सोनवणे (जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार)