संमेलनात दोन दिवसांत ५० लाखांची ग्रंथविक्री ; नव्या पिढीलाही पुस्तकांचे आकर्षण; वाचकांचा अपूर्व उत्साह

युवा पिढीकडून अनुवादित पुस्तकांना सर्वाधिक मागणी असल्याचे प्रकाशक व विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

नाशिक येथील साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनास शनिवारी साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शफी पठाण, अनिकेत साठेनाशिक : साहित्य संमेलनाच्या वार्षिक उत्साहाच्या निमित्ताने यंदा नाशिकमध्ये वाचकांनी दोन दिवस पुस्तकांची लयलूट केली. पावसाचे सावट दूर झाल्यामुळे संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनास साहित्यप्रेमींची इतकी गर्दी होती, की शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत ५० लाखांची पुस्तके विकली गेल्याचा दावा प्रकाशकांनी केला. युवा पिढीकडून अनुवादित पुस्तकांना सर्वाधिक मागणी असल्याचे प्रकाशक व विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उद्घाटन सोहळ्यास गर्दी झाली. ग्रंथ प्रदर्शनात फिरण्यास अनेकांना वेळ मिळाला नाही. ती कमतरता शनिवारी भरून निघाली. सकाळी दहा वाजल्यापासून संमेलनस्थळी ग्रंथप्रेमींची गर्दी होऊ  लागली. सोनाली वडजे या श्री. ना. पेंडसे यांचे तुंबाडचे खोत हे पुस्तक शोधत होत्या. शालेय जीवनात वाचलेले पुस्तक संमेलनात नक्कीच खरेदी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनात व. पु. काळे, वि. स. खांडेकर आदी लेखकांच्या मराठी पुस्तकांना मागणी आहे. नव्या पिढीतील वाचकांचा अनुवादित पुस्तकांकडे कल आहे. त्याची कारणमीमांसा करताना मेहता पब्लिकेशनच्या संध्या कुलकर्णी यांनी ही पिढी काल्पनिकतेपेक्षा सत्यकथांवर विश्वास ठेवणारी असल्याचे सांगितले. मराठी कथा, कादंबऱ्यांचे ठरावीक विषय असतात. इंग्रजीत विषयांचे वैविध्य असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ग्रंथालीच्या प्रतिनिधीने दुसऱ्या दिवशी प्रतिसाद वाढल्याचे मान्य केले. अभ्युदय, टपालकी, किटाळ, तिसरा डुळा आदी पुस्तकांची वाचकांनी विचारणा केल्याचे सांगितले. तर संमेलनात भारताचे संविधान, गुलामगिरी, सत्यधर्म आदी पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे संदर्भ प्रकाशनचे चंद्रकांत लबडे यांनी सांगितले. ग्रंथ प्रदर्शन समितीचे प्रमुख ज्योतीराव खैरनार यांनी शनिवारी ग्रंथ प्रदर्शनात किमान २५ लाखांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला. रविवारी पुस्तक खरेदीचा उत्साह आणखी वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संमेलनस्थळावरील अंतर्गत रस्त्यावर दूर अंतरापर्यंत हे कक्ष उभारले गेले. त्यामुळे फिरताना अनेकांची दमछाक होते. उस्मानाबादच्या संमेलनात समोरासमार कक्ष उभारण्यात आले होते. तिथे वाचकांना भ्रमंती सुलभ होती असे डायमंड प्रकाशनच्या नीलेश पाष्टे यांनी सांगितले. प्रदर्शनातील कक्षाच्या आखणीवर अनेक विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

वाचकांची दमछाक   

उस्मानाबाद येथील संमेलनापेक्षा नाशिकमध्ये अधिक ग्रंथ विक्री होईल की नाही, याबाबतची स्पष्टता रविवारी समारोपानंतर होईल. तथापि, नाशिकच्या संमेलनात ग्रंथ प्रदर्शनातील कक्ष वाचकांची दमछाक करीत आहे.

आनंदचित्र.. 

या प्रदर्शनात सुमारे २५० प्रकाशक, पुस्तक विक्रेते सहभागी झाले आहेत. सर्वत्र पुस्तक खरेदीसाठी गर्दी होती. विज्ञानविषयक पुस्तके विद्यार्थी पालकांच्या सोबतीने खरेदी करताना दिसली. नवीन पिढी वाचनाकडे आकृष्ट होत आहे. पण नेहमीच्या मराठी कथा, कादंबऱ्यांऐवजी त्यांचा अनुवादित साहित्याकडे कल असल्याचे निरीक्षण प्रकाशक व विक्रेत्यांनी नोंदविले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Book sales of rs 50 lakh in two days in 94 akhil bharatiya marathi sahitya sammelan zws