‘इजी ट्रॅव्हलर’ उपकरणाने पासधारकांची सोय
रोजच्या प्रवासासाठी मिळणाऱ्या पासची होणारी बिकट अवस्था पाहता येथील वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी ‘इजी ट्रॅव्हलर’ हे अनोखे ब्रेसलेट पद्धतीचे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून विद्यालयाच्या या उपक्रमास बंगळूरू येथे झालेल्या ‘इनोव्हेशन फेस्टिव्हल २०१६’ मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. विद्यालयाच्या वतीने पुढील टप्प्यात या उपकरणाची जिल्हास्तरावर चाचपणी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका रेखा काळे यांनी दिली.
इंटेन्ट टेक चॅलेज संस्थेच्या वतीने देशपातळीवर या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सहा ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांंकडून विविध विषयांवर कल्पना मागविण्यात आल्या होत्या. त्यात बिटको गर्ल्स हायस्कूलने पासधारकांना उपयुक्त अशा ब्रेसलेट पद्धतीचे उपकरण ही संकल्पना मांडली. राज्य पातळीवरील दुसऱ्या टप्प्यात २०० शाळांची निवड झाली. शाळांकडून आलेल्या कल्पनांना मूर्त रूप येण्यासाठी ‘मेकॅथॉन’ हा तिसरा टप्पा पार पडला. अंतिम टप्प्यासाठी देशपातळीवर ७२ प्रकल्पांची निवड करण्यात आली. यामध्ये बिटको गर्ल्स हायस्कूलचा समावेश होता. १६ व १७ एप्रिल रोजी ‘इनोव्हेशन फेस्टिव्हल २०१६’ मध्ये हे सर्व प्रकल्प ठेवण्यात आले. स्पर्धेत गव्हर्न्मेंट स्कूल गटात बिटकोने प्रथम क्रमांक पटकावला. प्रकल्प निर्मितीसाठी नववीच्या विद्यार्थिनी अर्पिता म्हाळणकर व गायत्री बागूल यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे पदाधिकारी प्रभाकर कुलकर्णी, प्रकाश वैशंपायन व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यापासून प्रकल्प समन्वयक अरुण महाजन, मेघना देशपांडे व विद्यार्थिनी प्रयत्नशील होत्या. प्रकल्पांवर राष्ट्रीय स्तरावर विजयश्रीची मोहर उमटल्यानंतर स्थानिक पातळीवर राज्य परिवहन महामंडळाशी चर्चा करत त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
यामुळे विद्यार्थ्यांना ऊन, पाऊस याचा त्रास न होता पास सांभाळता येणार आहे. तो काढण्यासाठी गर्दीही करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांसाठी तसेच पासधारकांसाठी हे यंत्र उपयुक्त असल्याचा दावा काळे यांनी केला. बुधवारी संस्थेच्या वतीने विजेत्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
कसा आहे प्रकल्प?
ब्रेसलेट आकारातील हे उपकरण पासधारक आणि बसवाहक या दोघांच्या हातांना बांधले जाईल. वाहक आणि पासधारक यांनी यातील एक विशिष्ट बटण दाबल्यानंतर पास न दाखवताही यंत्रणा संगणकीय असल्याने काम सिग्नल पद्धतीने सुरू राहील. पासची मुदत सुरू आहे हे दर्शविण्यासाठी हिरवा रंग, मुदत संपत आली हे सांगण्यासाठी पिवळा आणि संपला हे सांगण्यासाठी लाल रंग. तसेच, पास हा विशिष्ट अंतरापुरता मर्यादित असतो. मात्र त्या अंतराच्या पलीकडे पासधारकास जायचे असेल तर त्याला ऑनलाइन पद्धतीने रिचार्ज करून इच्छित स्थळी पोहचता येईल.