पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात सोमवारी दर्शनासाठी रामभक्तांमुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेत संशयित महिलेने चोरलेले बाळ पोलिसांच्या तत्परतेने तीन ते चार तासांच्या आत परत मिळाले. या प्रकरणात एका भिकारी महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्येतील सोहळ्यामुळे सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पंचवटीतील काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता गोदाकाठ परिसरासह अन्य ठिकाणी गस्त वाढवण्यात आली होती.
हेही वाचा >>> “मोरारजी देसाईंचे पोलीस लालबाग-परळच्या चाळींवर…”, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ‘त्या’ कृतीवरून ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार हे पथकासह गोदाकाठ परिसरात गस्त घालत असताना त्यांना पिंपळपार चौकात भिकारी महिला एक वर्षाच्या लहान बाळाला घेऊन आडोशाला भीक मागताना दिसली. महिला आणि तिच्याजवळील बाळ यांच्यात कोणतेही साम्य आढळत नसल्याने पोलिसांना संशय आला. गुन्हे शोध पथकाने महिलेकडे चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तिच्या जवळचे बाळ हे मुलगा असल्याचे सांगितले. परंतु, पथकाने बाळाला ताब्यात घेऊन पाहणी केली असता बाळ मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी खास आपल्या खाक्यानुसार चौकशी करताच महिलेने रामकुंड परिसरातून सायंकाळी सहाच्या सुमारास बाळ पळवल्याची कबुली दिली. दरम्यान, बाळ हरवल्याची तक्रार पालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात केली होती. भद्रकाली पोलिसांनी पंचवटी पोलीस ठाण्यात विचारणा केली असता त्यांनीही दुजोरा दिला. महिला आणि बाळ यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. बाळाचे नाव विकी कांबळे (रा. जत्रा हॉटेलजवळ) आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित सुनिता काळे (४५, रा. नाशिकरोड) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.