फुटिरांची कोंडी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बजावलेल्या व्हीपमुळे प्रभाग सभापती निवडणुकीत कमालीचा गोंधळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. मंगळवारी सातपूर, सिडको व नाशिकरोड प्रभाग सभापतींची निवड अविरोध पार पडली. गेल्या काही दिवसात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडय़ा मारणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. संबंधितांना धडा शिकविण्यासाठी राजकीय पक्षांनी व्हीप बजावत त्याचे पालन न झाल्यास कारवाईचे संकेत दिले. सातपूर येथे मनसेने दोन व्हीप बजावल्या. या एकंदर घडामोडींमुळे सर्वच समीकरण बदलल्याने सातपूर प्रभागात तर महाआघाडी आणि महायुती अशा सर्वच नगरसेवकांनी मनसेच्या उमेदवारास मतदान केले.
प्रभाग सभापती निवडणुकीवर गेल्या दीड महिन्यांत झालेल्या पक्षांतराचे सावट होते. गेल्या काही दिवसात सत्ताधारी मनसेतून बाहेर उडय़ा मारणाऱ्या नगरसेवकांची संख्या १२ वर पोहोचली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व माकपलाही पक्षांतराची झळ बसली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान करणारे नगरसेवक नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या तक्रारीमुळे विभागीय आयुक्तांनी दोघांचे सदस्यत्व रद्द केले. या पाश्र्वभूमीवर, प्रभाग सभापती निवडणुकीत फुटीरांना खिंडीत गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी व्हीप बजावत अधिकृत उमेदवाराला मतदान करावे अथवा मतदान प्रक्रियेबाहेर रहावे, असे सूचित केले होते. अपात्रतेच्या कारवाईची भीती पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना होती. सातपूर प्रभागात माकपच्या नंदिनी जाधव यांनी सेनेत तर सचिन भोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिडकोत मनसेचे अरविंद शेळके व रत्नमाला राणे यांनी सेनेत प्रवेश केला तर जनराज्य आघाडीचे दोन सदस्य याआधीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. नाशिकरोड प्रभागात मनसेचे शिंदे व शेलार यांना आधीच अपात्र ठरविले गेल्याने त्यांचा मतदानात सहभागी होण्याचा प्रश्नच नव्हता.
सातपूर प्रभाग सभापतीची निवड सकाळी पार पडली. या ठिकाणी मनसे सहा, सेना एक, भाजप एक, राष्ट्रवादी दोन, काँग्रेस एक, माकप एक आणि रिपाइ एक असे बलाबल आहे. महाआघाडीच्या जागा वाटपात ही जागा प्रथम राष्ट्रवादीला दिली जाणार होती. रात्री उशिराच्या बैठकीत सातपूर प्रभाग मनसेला तर पूर्व प्रभाग राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित झाले. यामुळे मनसेने आधी बजावलेली व्हीप पुन्हा नंतर बदलावी लागली. सभापती पदासाठी मनसेच्या सविता काळे यांच्यासह सेनेकडून नंदिनी जाधव आणि राष्ट्रवादीच्या उषा अहिरे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अहिरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. महाआघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे महायुतीने महाआघाडीच्या उमेदवारास मतदान केले. यामुळे ही निवडणूक अविरोध होऊन मनसेच्या काळे यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सिडको प्रभाग सभापतीपदी अश्विनी बोरस्ते यांची निवड झाली. सिडकोत सेना सात, भाजप दोन, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस दोन, माकप एक आणि मनसे सात असे पक्षीय बलाबल आहे. मनसेने व्हीप बजावल्याने फुटीरांची अडचण झाली. महाआघाडीत ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. एकंदर बलाबलात काही साध्य होणार नसल्याने अखेरीस सेनेला माघार घ्यावी लागली. नाशिकरोड प्रभागात सेना आठ, भाजप दोन, राष्ट्रवादी चार, काँग्रेस दोन, मनसे पाच, अपक्ष एक आणि रिपाइं दोन असे बलाबल आहे.
समीकरणे बदलली तरी सेनेचे वर्चस्व होते. या ठिकाणी रिपाइंचे सुनील वाघ, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे व काँग्रेसच्या वैशाली भागवत यांनी अर्ज दाखल केले. या प्रभागातील निवडणूकही अविरोध झाली. इतरांनी अर्ज मागे घेतल्यामुळे लवटे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.