नाशिक : पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागाव पिंप्री येथील शेतकरी कमळाबाई कुऱ्हाडे यांनी आपला गट क्रमांक ६७३ चे ०.५९०० हेक्टर आर क्षेत्राचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदविले आहे, या निमित्ताने भू संपादनाचा श्रीगणेशा झाला असून इतर भुधारकांनीही संमतीने सहा महिन्यात वाटाघाटीने खरेदीखत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
पुणे-नाशिक दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे मार्गास मंजुरी मिळाल्यानंतर एकेका कामाला सुरुवात होत आहे. या मार्गासाठी आपली शेतजमीन देण्यास प्रारंभी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. परंतु, नंतर भरीव मोबदला देण्याची मागणी केली. विद्युतीकरणासह बांधकामासाठी प्रस्तावित खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत जिरायत, हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी प्राथमिक दर अलीकडेच जाहीर करण्यात आले आहेत. या दरानुसार खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी ‘महारेल’ आणि जमीन मालकांना पुढील सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील मौजे बारागांव पिंप्री, पाटिपप्री, दातली आणि वडझिरे तसेच मौज दोडी खुर्द, देशवंडी या गावांचे जिल्हास्तरीय समितीने प्रती हेक्टरी दर निश्चित केले आहेत. या प्रक्रियेंत जिल्ह्यातील पहिल्या खरेदी खताची नोंद झाली. भूसंपादनात खरेदीखत नोंदविण्यासाठी पुढील सहा महिन्यांसाठीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. इतर भूधारकांनीही वाटाघाटीतून थेट खरेदी करण्यास संमती देऊन खरेदीखत लवकरात लवकर नोंदविण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. वडझिरे येथील शेतकऱ्यांनी अलीकडेच खा. हेमंत गोडसे यांची भेट घेऊन मिळणारा मोबदला कमी असून त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
एक कोटीचा मोबदला
सिन्नर तालुक्यातील मौजे बारागाव पिंप्री येथिल शेतकरी कमळाबाई कुऱ्हाडे यांच्या गट क्रमांक ६७३ चे ०.५९०० हेक्टर आर क्षेत्रासाठी जिल्हास्तरीय समितीने एक कोटी, एक लाख ८४ हजार ७६० रुपयांची मोबदला रक्कम निश्चित केली आहे. कुऱ्हाडे, ‘महारेल’ व महसूल अधिकारी यांनी सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रेल्वे प्रकल्पाचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदवले.