दिल्लीत आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना भेटावयास गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत आंदोलकांनी आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला.

या बाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हा प्रशासनास दिले. दिल्लीत ‘वन रँक-वन पेन्शन’चा मुद्दा तापलेला असतांना एका माजी सैनिकाने आत्महत्या केली. त्यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गेले असता पोलिसांनी त्यांची भेट संबंधितांशी होऊ दिली नाही. तसेच त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव केला. उलटपक्षी गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मारहाण करत त्यांना अटक केली. ही कार्यशैली लोकशाहीला घातक असून सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने चालल्याचा आरोप आंदोलकांनी केला. लोकांना न्याय मिळावा यासाठी गांधी गेले असता त्यांना दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. राहुल गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला अशी वागणूक देणे चुकीचे असून सरकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. देशात आंदोलन करण्याचा, न्याय मागण्याचा सर्व नागरिकांना समान हक्क व अधिकार आहे. या अधिकारावर सरकार गदा आणत जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.

या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु यानंतरही पक्षाच्या उपाध्यक्षांना पुन्हा रात्री अटक करण्यात आली. सरकारने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर सूड भावनेने कारवाई केल्यास त्याचे पडसाद संपुर्ण देशात उमटतील तसेच पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, शाहु खैरे, बबलु खैरे, लक्ष्मण जायभावे, पांडुरंग बोडके पदाधिकारी आदी सहभागी झाले होते.