चार दिवस काथ्याकूट करत सेना-भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा आणि उमेदवारांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. महायुतीने एखादा अपवाद वगळता जिल्ह्य़ातील सर्व उमेदवारांची निश्चिती केली. काँग्रेस आघाडीने मात्र तसे उमेदवार जाहीर केले नाहीत. नाशिक मध्य, नांदगाव, सिन्नर अशा काही जागांवर परस्परांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यात तिकीट न मिळाल्याने नाराज बंडखोरांनी आघाडीकडून संधी मिळेल काय, याची चाचपणी चालविली आहे. या घडामोडीत उमेदवार कधी जाहीर होणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शुक्रवार ही अंतिम मुदत आहे. केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने महायुतीने आणखी विलंब न करता सोमवारी दुपारी जिल्ह्य़ातील उमेदवार जाहीर केले. एक-दोन जागांचा त्यास अपवाद आहे. युतीची यादी जाहीर होऊनही आघाडीच्या गोटात फारशा हालचाली नाहीत. उमेदवारी यादी कधी जाहीर होणार, तर लवकरच होईल हे स्थानिक नेत्यांचे उत्तर. तिकीट न मिळाल्याने सेना-भाजपमधील नाराजांनी इतर पक्षातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सक्षम नाराजांना गळाला लावण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांचा घोळ मिटलेला नाही. राष्ट्रवादीच्या ताब्यातील नांदगाव काँग्रेसने परत मागितला, तर काँग्रेसकडील नाशिक मध्यवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. मालेगाव बाह्य़ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तीन ते चार मतदारसंघांतील त्रांगडे सुटत नसल्याने आघाडीची यादी जाहीर झालेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आघाडीत कोणतीही रस्सीखेच नसल्याचा दावा केला. उभय पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून समन्वयाने काम सुरू आहे. जिल्ह्य़ातील १५ जागांवर जिथे ज्या पक्षाचा सक्षम असेल, त्याला ती जागा देण्याची उभयतांची तयारी आहे. निवडून येण्याची क्षमता राखणाऱ्याला उमेदवारी दिली जाईल. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते निवडणूक अर्ज भरण्यात व्यस्त होते. बुधवारी यादी जाहीर होईल, असे आव्हाड यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने मालेगाव बाह्य़ची जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शविली आहे. नाशिक मध्य, सिन्नर, नांदगाव अशा काही मतदारसंघांत अदलाबदल करण्याचा विचार पक्षीय पातळीवर झाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी काही जागांची अदलाबदल होणार असल्याचे मान्य केले. समोर कोण उमेदवार आहे ते पाहून आघाडीचा उमेदवार ठरविला जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, इतर पक्षांतील बंडखोर आघाडीचा कानोसा घेत आहेत. जो पक्ष तिकीट देईल, त्यात प्रवेश करून मैदानात उतरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.