scorecardresearch

इगतपुरी मतदारसंघात पक्षांतराची परंपरा कायम

काँग्रेसच्या निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित. समवेत राज्यमंत्री दादा भुसे, खा. संजय राऊत आदी
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा संपूर्ण इतिहास बंडखोरी आणि पक्षांतराची साक्ष देणारा असून आगामी विधानसभा निवडणूक त्याला अपवाद नाही. या मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गावित यांनी शिवबंधन बांधले. प्रदीर्घ काळ काँग्रेसचे खासदार राहिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या निर्मला गावित या कन्या आहेत. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यात गावित यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

गावित यांच्या सेना प्रवेशाने मतदारसंघात पक्षांतराची परंपरा कायम राहिली. पूर्वीपासून काँग्रेसच्या बाजूने झुकते माप देणारा हा मतदारसंघ आहे. पक्षांतर करून पहिली निवडणूक लढवण्याचा मान तत्कालीन आमदार भाऊ  वाघ यांना जातो. १९८० मध्ये वाघ यांनी काँग्रेस सोडून अर्स काँग्रेसमध्ये जाऊन निवडणूक लढविली. त्यावेळी ते पराभूत झाले होते. १९८५ मध्ये भाजप सोडून अर्स काँग्रेसमध्ये शिवराम झोले यांनी प्रवेश केला होता. यानंतर पुलोदची उमेदवारी घेऊन ते आमदार झाले होते. १९९० मध्ये भाजपची कोणतीही लाट नव्हती. मतदारसंघात भाजपचे बळ अजिबात नव्हते. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून मिळणारी उमेदवारी सोडून यादवराव बांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या कमळ चिन्हावर युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. भाजपचे या मतदारसंघातील पहिले आमदार होण्याचा बहुमान बांबळे यांच्याकडे जातो. पुढे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी १९९५ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. १९९५ मध्ये अर्स काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले. त्या वेळी शिवराम झोले यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदारकी मिळवली. १९९९ मध्ये पांडुरंग बाबा गांगड यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवधनुष्य हाती धरले. सेनेची उमेदवारी मिळवून ते आमदार झाले. याच वेळी शिवराम झोले यांनी राष्ट्रवादीची कास धरली होती.

डाव्या आघाडीच्या तिकिटावर यापूर्वी निवडणूक लढून पराभूत झालेले काशिनाथ मेंगाळ यांनी २००४ मध्ये मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. सेनेची उमेदवारी मिळवून ते तालुक्यातील सर्वात युवा आमदार म्हणून विजयी झाले. २००९ मधील निवडणुकीच्या तोंडावर मेंगाळ यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. मनसेत प्रवेश करून तिकीट मिळवले. त्याच वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपाळराव गुळवे यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला गावित यांना इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात इंदिरा काँग्रेसचे तिकीट मिळवून दिले. गावित यांनी मनसेच्या मेंगाळ यांचा पराभव करून स्थान भक्कम केले. पुढे २०१४ मध्ये मेंगाळ यांनी मनसेची साथ सोडून अपक्ष निवडणूक लढवली. यावेळीही त्यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. याच वर्षी शिवराम झोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि धनुष्य हाती घेतले. निर्मला गावित यांनी त्यांचा पराभव केला होता.

पुन्हा पक्षांतर घडणार?

एका पक्षाने मोठे केल्यानंतर त्या पक्षाला झुगारून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली जाण्याचा मतदारसंघाचा इतिहास आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काही काळातच काशीनाथ मेंगाळ यांनी मनसेतून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवराम झोले यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपचे उमेदवार असणारे चंद्रकांत खाडे यांनी भाजप सोडून शिवसेना धरली आणि मधल्या काळात ते नाशिक येथे नगरसेवक म्हणून निवडून आले. युतीत पूर्वीपासून शिवसेनेच्या वाटय़ाला असणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले झोले यांच्याकडून हा मतदारसंघ भाजपकडे मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. तसे न झाल्यास झोले काय भूमिका घेतील, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे. मेंगाळ यांना उमेदवारीमध्ये डावलल्यास निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांना कुठे घेऊन जाते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress nirmala gavit enters shiv sena abn

ताज्या बातम्या