मालेगाव : १४ मयत संशयितांचे अहवाल ते करोनाबाधित असल्याचे आल्याने मालेगावात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३४ वर पोहचली आहे. तसेच सोमवारी १३ नव्या रुग्णांचा सकारात्मक अहवाल आल्याने मालेगाव तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ५५६ झाली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ६८६ तर मृतांची संख्या ३६ इतकी आहे.
शनिवारपर्यंत मालेगावातील करोनामुळे झालेल्या मृतांची संख्या २० आणि करोना संशयित मृतांची संख्या ५८ होती. या संशयित मृतांपैकी तब्बल १४ जणांचे चाचणी अहवाल सकारात्मक असल्याचे आता आढळून आले आहे. त्यामुळे मालेगावातील मृतांची संख्या ३४ झाली. सोमवारी तीन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले.
मालेगावातील १७३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३ अहवाल सकारात्मक आणि १४७ अहवाल नकारात्मक आले. १० अहवाल आधीच्या बाधित रुग्णांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे आहेत. त्यामुळे नव्याने १३ बाधित रुग्णांची भर पडली. अन्य तिघा रुग्णांचे अहवाल कोणतेही निष्कर्षांविना आले आहेत. सायंकाळी जिल्ह्य़ातील ९५ अहवाल प्राप्त झाले. त्यात दिंडोरी तालुक्यातील दोन रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. नव्याने आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये संगमेश्वर भागातील ज्योती नगर येथील चार आणि राज्य राखीव दलाच्या दोघा जवानांचा समावेश आहे. याशिवाय द्याने,आयेशानगर,आनंद सागर सोसायटी, मुस्लिमपुरा, शब्बीर नगर, गोल्डन नगर आणि आंबेडकर नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
म्हाळदे घरकुल योजनेतील केंद्र बंद
म्हाळदे घरकुल योजनेत सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या केंद्राबद्दल रुग्णांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र योग्य उपचार आणि सुविधा मिळत नसल्याची तेथील रुग्णांनी ओरड सुरू केल्याने रविवारी सायंकाळपासून प्रशासनातर्फे त्यांना अन्यत्र हलविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.