खर्चात बचत आणि वेळेत उपचार होत असल्याचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाड : खासगी विशेषज्ज्ञ डॉक्टरांसह कौटुंबिक डॉक्टरांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील गरज ओळखत करोना रुग्णांवर उपचार सुरू के ल्याने आता कमी खर्चात आणि वेळेत उपचार होऊ लागले असल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. मनमाड शहर परिसरातील प्रमुख खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये ९५ टक्के रुग्ण हे करोनाचेच दाखल होत आहेत. शहरातील काही खासगी रूग्णालयांमध्ये दिवसभरात मर्यादित रुग्णांवर उपचार होत असल्याने नंबर लावण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे खासगी तपासणी प्रयोगशाळा, करोना चाचणीची परवानगी देण्यात आलेले खासगी केंद्र, औषधालय येथेही करोना रुग्णांचीच दिवसभर गर्दी दिसून येते. कान, नाक, घसा, डोळे, दंत, त्वचा तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक आदी विशेषज्ज्ञांकडे मात्र सध्या शुकशुकाट आहे. ‘मागणी तसा पुरवठा‘, या न्यायाने खासगी कौटुंबिक डॉक्टरांनी करोना उपचार सुरू के ला. त्यामुळे सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसात करोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर रुग्णाची तपासणी, गोळ्या, औषधे, प्रयोगशाळा, इंजेक्शन, सलाइन आदींचा खर्च १० ते १२ हजार रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबातील भीती कमी होण्यास मदत झाली आहे.

सध्या ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, घशात खवखव, तोंडाची चव जाणे, स्नायूदुखी अशी कोणतीही लक्षणे दिसली तरी जागरूकता वाढल्याने करोनाच्या भीतीने रुग्ण आधी कौटुंबिक डॉक्टरांकडे धाव घेतो . तेथेच जुजबी चाचण्यांची सोय उपलब्ध झाल्याने पुढील गुंतागुंत आणि मोठय़ा शहरात जाण्याचा खर्च टळून वेळेत बचत होऊ लागली आहे.

कौटुंबिक डॉक्टर काय करतात?

प्राथमिक लक्षणे तपासून छातीचा साधा एक्स रे काढला तरी रुग्णाच्या आजाराची प्राथमिक अवस्था लक्षात येते. तेव्हाच स्त्रावाचा नमुना द्यायला सांगून करोना प्रतिबंधक औषधांचे उपचार सुरू केले जातात. सकारात्मक अहवाल आल्यास रक्ताची चाचणी आणि आवश्यकता भासल्यास फुफ्फु साची सोनोग्राफी, एचआरसीटी करण्यास सांगितले जाते. रक्तातील गुठळ्या पातळ होण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. काही डॉक्टर सलाईनही लावतात.  या सर्व उपचारांचा खर्च १२ ते १५ हजारांच्या आसपास येतो. फुफ्फु सात गुंतागुंत झाल्यानंतरच  मोठे रुग्णालय, प्राणवायू सुविधायुक्त खाट, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. परंतु, सध्या अशा रुग्णांचे प्रमाण १० ते १५ टक्केच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे

कोणतेही प्राथमिक लक्षण आढळल्यास पहिल्या दोन दिवसांत योग्य उपचार झाल्यास करोना १० दिवसांत आटोक्यात येतो. त्यामुळे पुढे होणारा लाखांचा खर्च टाळून अवघ्या १० ते १२ हजार रुपयांत रुग्ण बरा होण्याची शक्यता असते.

– डॉ. संदीप कुलकर्णी (हृदयरोगतज्ज्ञ)

अनेक कौटुंबिक डॉक्टरांवर नेहमीचे रुग्ण विश्वास ठेवून करोनाचे उपचार आणि तपासण्या स्थानिक ठिकाणीच करून घेत आहेत. त्यामुळे आमचीही जबाबदारी वाढली आहे

– डॉ. सुनील बागरेचा (ज्येष्ठ कौटुंबिक डॉक्टर)

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona patients rush to private doctors in rural areas for treatment zws
First published on: 06-04-2021 at 00:11 IST