महिला डॉक्टरसह पाच जणांचा समावेश

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यानंतर अन्य ठिकाणीही बनावट नोटा व्यवहारात आणण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. लासलगाव पोलिसांनी असाच एक प्रकार उजेडात आणला. २५ हजारांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याची तयारी दर्शवत बनावट नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी एका महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

संशयित महिला डॉक्टर, तिचे पती बनावट नोटांसाठी ग्राहक शोधत होते. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी बनावट नोटा देणारे आणि घेणाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी मंगळवारी लासलगाव येथील मोहन पाटील, त्यांची पत्नी डॉ. प्रतिभा घायाळ (दोन्ही रा. बोराडे रुग्णालय जवळ) आणि विठ्ठल नाबरिया (कृषिनगर, कोटमगाव रस्ता) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा संशयितांचा मित्र रवीद्र राऊत (स्मारकनगर, पेठ), विनोद पटेल (चाणक्य इमारत, सूर्यवंशी रस्ता, पंचवटी, नाशिक) हे सायंकाळी ५०० रुपयांच्या बनावट नोटा देणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. 

या पथकाने येवला रस्त्यावरील विंचुर येथे सापळा रचला. संशयितांना बनावट नोटा देण्यासाठी इटीऑस मोटारीतून आलेल्या रवींद्र राऊत आणि विनोद पटेल यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या २९१ बनावट नोटा, चार लाखांची मोटार जप्त करण्यात आली. संशयितांनी भारतीय चलनातील बनावट २९१ नोटा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच नोटा जवळ बाळगल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने

त्यांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकात उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहाय्यक उपनिरिक्षक राजेंद्र

अहिरे, हवालदार बाळु सांगळे, पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, मनिषा शिंदे, माया वाघ आदींचा समावेश होता.

२५ हजाराच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा

संशयित डॉ. प्रतिभा घायाळ यांचा लासलगाव परिसरात दवाखाना आहे. त्यांच्यासह पती मोहन पाटील, साथीदार विठ्ठल नाबरिया हे बनावट नोटांसाठी ग्राहक शोधत होते. बनावट नोट दाखवून २५ हजार रुपयांच्या मोबदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा त्यांच्याकडून दिल्या जाणार होत्या. ग्राहक शोधताना बनावट नोटा व्यवहारात आणणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली.