अतिरिक्त प्राणवायू उद्योगांना देण्याची मागणी

नाशिक : कठोर टाळेबंदीत १२ दिवस बंद राहिलेल्या जिल्ह्याातील औद्योगिक क्षेत्रात यंत्रांचा खडखडाट सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाला. सातपूर, अंबडसह अन्य वसाहतीत बहुतांश कारखान्यात उत्पादन प्रक्रिया पूर्ववत होत आहे.

दुसऱ्या लाटेत औद्योगिक प्राणवायूचा पुरवठा बंद करून तो वैद्यकीय क्षेत्राकडे वळविण्यात आला. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे प्राणवायूची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त प्राणवायू उद्योगांना वापरासाठी पुन्हा उपलब्ध केल्यास त्यावर अवलंबून उद्योगही सुरू करता येतील. स्थानिक पातळीवरील सुमारे २५ ते ३० टक्के उद्योगांना प्राणवायूची निकड भासते.  त्याअभावी या उद्योगांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

प्राणवायूची मागणी-पुरवठा या संदर्भातील आढावा घेऊन औद्योगिक वापरासाठी प्राणवायू वापराची परवानगी मिळावी, अशी मागणी अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे के ली आहे.

कठोर टाळेबंदीत प्रशासनाच्या अटी-शर्तींची पूर्तता करणे अवघड असल्याने सातपूर, अंबडसह अन्य औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योग बंद झाले होते. टाळेबंदी शिथील करताना उद्योगांनी  कामगार आणि कुटुंबियांची जबाबदारी घेत असल्याचे हमी पत्र सादर करण्याच्या मुद्याने उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आयमाने पाठपुरावा केल्यानंतर उद्योगांसाठी तशी कोणतीही अट टाकली गेली नाही. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, करोना नियमावलीचे पालन, कारखान्यातील सर्वांची चाचणी, कामावर येणाऱ्यांचे दैनंदिन तापमापन आणि आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.

वैद्यकीय प्राणवायूची मागणी कमी झाली असल्याने अतिरिक्त प्राणवायू उद्योगांना वापरास दिल्यास त्यावर अवलंबून असणारे उद्योग सुरू होतील, याकडे आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सरचिटणीस ललित बूब, निखील पांचाळ आणि धनंजय बेळे यांनी लक्ष वेधले.

सोमवारी बहुतांश कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरळीत झाली. स्थानिक पातळीवरील अभियांत्रिकी, लेझर कटींग, धातू आदी उद्योगांना प्राणवायूची गरज भासते. जवळपास २५ ते ३० टक्के उद्योग प्राणवायूवर अवलंबून आहेत. त्यांचे काम सध्या सुरू असले तरी त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त प्राणवायू हळूहळू उद्योगांना देता येईल. यावर प्रशासनाने नियंत्रण राखून उद्योगांच्या मागणीच्या किमान ३० ते ५० टक्क्यापर्यंत प्राणवायू द्यावा, अशी अपेक्षा आहे. – धनंजय बेळे (अध्यक्ष, आयमा विश्वस्त समिती)