‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड आणि नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड वेल्फेअर सेंटर यांच्या वतीने अंध, अपंगांसाठी आयोजित ‘डिव्हाइन सायकल रॅली’द्वारे पर्यावरण आणि आरोग्यावर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला.
रविवारी सर्वप्रथम दररोज सायकलिंग करणाऱ्या नाशिककरांसाठी नर्सरी ते त्र्यंबकरोड या तीन किलोमीटर मार्गावरील काही भाग सकाळी सहा ते आठ या वेळेसाठी सायकलिंगकरिता राखीव असल्याची निशाणी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी नाशिक सायकलिस्टचे योगेश शिंदे, शैलेश राजहंस, दत्तू आंधळे यांसह मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर महात्मानगर येथील क्रिकेट मैदानाजवळ महानॅब स्कूलच्या अंध विद्यार्थिनी, नॅब बहुविकलांग केंद्रातील बहुविकलांग मुले, नॅब कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी तसेच नॅबतर्फे चालविल्या जाणाऱ्या विशेष शिक्षणशास्त्र व अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तीनचाकी सायकल, व्हील चेअर व साध्या सायकलींसह डिव्हाइन सायकल रॅलीमध्ये मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.
नागरिकांनी या मुलांच्या प्रती तसेच पर्यावरण आणिा स्वत:च्या आरोग्यावर प्रेम करण्याचा संदेश या रॅलीमार्फत देण्यात आला.
या वेळी महापौरांसह, ज्येष्ठ क्रीडातज्ज्ञ भीष्मराज बाम, पोलीस उपायुक्त विजय पाटील, नाशिक सायकलिस्टचे संस्थापक हरीश बैजल, डॉ. महाजन बंधू आदींच्या हस्ते सायकलस्वारांना टी शर्ट व हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी स्वागत केले. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपाल सिंग, श्रीकांत जोशी, सुनील खालकर यांनी सायकलपटूंना मार्गदर्शन केले.