मास्क, हातमोजे देऊन बोळवण

चारूशीला कुलकर्णी, नाशिक

नाशिक : करोना विषाणूंचा संसर्ग पसरू नये म्हणून अहोरात्र काम करणारा आरोग्य विभाग मात्र पुरेशा सोयी सुविधा नसतांनाही अखंड सेवा देत आहे. शासकीय निकषांमुळे ‘पी.पी.ई.’ (व्यक्तिगत सुरक्षा) संचाऐवजी वैद्यकीय डॉक्टरांची बोळवण ही मास्क, हातमोजे देऊन होत असतांना आशा स्वयंसेविकांना मात्र तेही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून एचआयव्ही संच, प्रसुती दरम्यान वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर करून खबरदारी घेतली जात आहे.

नाशिक जिल्ह्य़ातही करोना संशयितांची संख्या दोन आकडय़ांपर्यंत गेली असून एका रुग्णाचा अहवाल हा सकारात्मक आल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली. जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नव्या काही निकषांमुळे करोना संशयितांच्या वाढत्या संख्येचा शासकीय रुग्णालयांवर ताण येत आहे. कोणता रुग्ण करोना संशयित असेल, या धास्तीने शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात अडगळीत पडलेले प्रसुती संच, एचआयव्ही संचचा वापर करण्यास डॉक्टरांनी सुरूवात केली आहे. जिल्ह्य़ात १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी बाह्य़ रुग्ण विभागात दिवसाला १०० हून अधिक रुग्णांची तपासणी होते. परंतु, या रुग्णांची तपासणी करण्यासाठी शासनाने ‘एन-९५’चे मास्क दिलेले नाहीत. ते आपल्या पातळीवर खरेदी करा, त्याचे देयक दिले जाईल. परंतु, रुग्णांची तपासणी ही तीन फुटाच्या अंतरावरून नव्हे, तर जवळून करावी लागते याकडे प्राथमिक वैद्यकीय आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी लक्ष वेध़तात. त्यातील काहींना दमा, श्वसनाचे आजार असतात. करोनाचा संसर्ग पाहता नव्या निकषानुसार हेही रुग्ण करोना संशयित म्हणून ग्राह्य़ धरले जात असतांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा नको का, असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे,  करोना संशयितांची ज्या ठिकाणी तपासणी होते त्या कक्षातील परिचारिकांना मास्क आणि हातमोजे दिले आहेत. याव्यतिरिक्त खबरदारीसाठी कुठल्याही सुविधा नाहीत. वास्तविक डॉक्टरांच्या काही मिनिटांच्या तपासणीनंतर कामाच्या पूर्ण आठ ते १० तासाच्या वेळेत परिचारिका, ब्रदर हेच रुग्णांच्या सानिध्यात असतात. मात्र त्यांच्या सुरक्षेविषयी संबंधित विभाग उदासीन असल्याची तक्रार नाशिक जिल्हा नर्स संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सर्वाना सुविधा देण्याचा प्रयत्न

जिल्ह्य़ात १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रात २६८ वैद्यकीय अधिकारी असून ७०० परिचारिका आणि ३०० पेक्षा अधिक सहाय्यक (ब्रदर) आहेत. त्यांच्या सुरक्षेनुसार हातमोजे, मास्क हे साहित्य दिले गेले आहे. शासकीय निकषानुसार रूग्णांचे अतिजोखीम, मध्यम जोखीम आणि कमी जोखीम यामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या नुसार पीपीई संच हे केवळ जोखमीच्या म्हणजे करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी यांच्यासाठीच आहे. त्याची साधारण किंमत तीन हजार रूपये आहे. सामाजिक बांधिलकी निधीतून अन्य साहित्य उपलब्ध करून घेण्यात आले आहे. या साहित्याचा १५ दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध असून पुढील नियोजन सुरू आहे.

– डॉ. दावल साळवे (जिल्हा आरोग्य अधिकारी)