मागणी करणाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये!

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कठीण असून सर्वच संस्थांच्या मागण्या पूर्ण करणे अवघड आहे.

नाशिक येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संस्था चालकांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला

नाशिक : राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कठीण असून सर्वच संस्थांच्या मागण्या पूर्ण करणे अवघड आहे. त्यामुळे मागणी करणाऱ्यांनी मागणी करतांना तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शहरातील गंगापूर रस्त्यावरील बालाजी लॉन्स येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उदघाटन पवार आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी पवार बोलत होते होते.

संस्थाचालकांना राज्य सरकारवर हस्तक्षेप करण्याची वेळ का येते, असा प्रश्न उपस्थित करून पवार म्हणाले, शैक्षणिक संस्था आणि शिक्षक संघटनांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची शासनाची जबाबदारी असून मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकारकडे आग्रह धरण्यात येईल. परंतु, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी संस्थांनी आधुनिक शिक्षणाची कास धरून अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराब देशमुख या सुधारकांच्या विचारांवर शैक्षणिक संस्थांचे जाळे महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. शैक्षणिक संस्था आणि शिक्षक संघटनांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ आणि आपण स्वत: प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.

महाराष्ट्र हा शिक्षणात प्रगत असून त्याचे श्रेय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना आहे. काही शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार होत असले तरी सर्वच शिक्षण संस्था या वाईट आहेत असे नाही. साखर सम्राट म्हटले तर बदनामीचा शिक्का लावला जातो, तसाच शिक्षण सम्राट म्हटले की तो शिक्का लावला जातो, हे योग्य नसल्याचे  भुजबळ म्हणाले.

मोफत शिक्षण कायद्यात खाजगी शिक्षण संस्थांसाठी तरतूद नसल्याने संस्था अडचणीत सापडल्या असून त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहेत. मोफत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत खाजगी शिक्षण संस्थांचा समावेश करण्यात यावा. तसेच शिक्षणासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी, यासह विविध मागण्या माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी यावेळी केल्या. स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. किरण सरनाईक यांनी शिक्षण क्षेत्रातील अडचणींचा पाढा वाचला.

दरम्यान, यावेळी राज्यस्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या शैक्षणिक संस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच अधिवेशनानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास  खासदार फौजिया खान, डॉ. सुधीर तांबे,  किशोर दराडे, किरण सरनाईक, सरोज आहिरे या आमदारांसह माजी आमदार हेमंत टकले, माजी आमदार विजय गव्हाणे आदींसह राज्यभरातील शिक्षण संस्था चालक उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dont stretch demand breaks ysh

ताज्या बातम्या