चारुशीला कुलकर्णी
जांभूळपाडय़ाला कोरड, स्थलांतराचे प्रमाण वाढले
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात पाणीटंचाई गहन होत असून जांभूळपाडा गावातील ग्रामस्थ विचित्र कोंडीत सापडले आहेत. शासनाने मुख्य विहिरीला पाणीपुरवठा करण्यासाठी दुसरी विहीर एक तपापूर्वी बांधली. पण त्या विहिरीत पाण्याचा थेंब नाही. गावात अन्य एक विहीर असल्याने जिल्हा प्रशासन टँकर देत नाही. टंचाईमुळे गावातून स्थलांतराचे प्रमाण वाढले असून दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने गावातील मुलांना कोणी मुलगी देण्यासही तयार नाही.
जांभूळपाडा हे दुर्गम भागातील गाव असून लालफितीचा कारभार आणि प्रशासकीय उदासीनता यात आदिवासी बांधव भरडले जात आहेत. दमणगंगालगतच्या या पाडय़ावर गुजरातमधील भ्रमणध्वनीची रेंज मिळते. हरसूलपासून १५ किलोमीटरवरील या गावात जाण्यासाठी मातीचा रस्ता आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच गावास टंचाईला तोंड द्यावे लागते. महिला दोन किलोमीटर अंतरावरील जुन्या विहिरीतून पाणी आणतात. जनावरांची तहान भागविण्याचे कामही हीच विहीर करते. बारा वर्षांपूर्वी या जुन्या विहिरीच्या बाजूला एक विहीर खोदली गेली होती. विद्युत जोडणी न केल्याने त्या काळात १२ लाखाचा खर्च केलेली ही योजना अपयशी ठरली.
अनेक योजना केवळ कागदावर दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची नोंद असल्याने प्रशासन या गावाला टँकर देत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.
आमचे गाव राज्याच्या सरहद्दीवर असल्याने कोणी अधिकारी फिरकत नसल्याची खंत ग्रामस्थ मनोहर दळवी यांनी व्यक्त केली. योजना केवळ कागदावर मंजूर होतात. पिण्याच्या पाण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
लग्नही जमेना
गावातील पाणीटंचाई लक्षात घेता गावात मुलगी देण्यास इतर गावातील ग्रामस्थ तयार होत नाहीत. दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. गावातील महिलांचा बराचसा वेळ पाणी आणण्यात जातो. कोणताही अधिकारी फिरकत नसल्याने अनेक योजनांपासून हे गाव कोसो मैल दूर आहे. गावाला किमान पिण्यासाठी पाणी मिळावे, ही एकमेव अपेक्षा ठेवत ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे.
गावात मूलभूत सुविधांचा अभाव
गावात पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर आहे. या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होतो, पण तीही आटली आहे. रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ हतबल आहेत. गावातील स्मशानभूमीची अवस्था अतिशय भयंकर असून तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. खासगी शेतातून वाट काढत जावे लागते. स्मशानभूमी बघितल्यावर धक्काच बसतो. बिनछताच्या या स्मशानभूमीत कुठलीच व्यवस्था नाही. टंचाईमुळे अनेकांनी गाव सोडले आहे.
– प्रा. आनंद बोरा (पर्यावरण मित्र)