नाशिक : जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि तक्रारीसंदर्भात कोणत्याही उपाययोजना न के ल्याने गुरुवारी जिल्ह्य़ातील शिक्षक संघटनांनी कार्यालयात माध्यमिक शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने कार्यालयास कुलूप लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा शिक्षक परिषद आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्या बाहेरगावी गेल्याचे समजले. अधीक्षक सुधीर पगार आणि उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना चर्चेसाठी पाठविण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक कार्यालयाबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. अनेक वर्षांपासून पुरवणी देयके नाहीत. १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रकारचे वैद्यकीय देयके काढण्यात आल्याचे वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांनी सांगितले. तथापि, बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या मागील अनेक देयके पुरावे म्हणून सादर केले. संबंधित देयके निघाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. टाळेबंदीतही काही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत येण्याबाबत सक्ती करतात. कारणे दाखवा नोटिसा देतात. याबाबत संबंधित शाळांची नावे कळविल्यास त्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी आणि वैयक्तिक मान्यता,पदोन्नती याबाबतही अधिकाऱ्यांना कोणतीही मुद्देसूद माहिती देता आली नाही. निवेदन देऊनही शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने निषेध म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या खूर्चीला निवेदन चिटकविण्यात आले. त्यांच्या कार्यालयाला कुलूप लावले. पगार आणि शहारे यानी विनंती केल्याने पदाधिकाऱ्यांनी नंतर कुलूप काढले. सविस्तर बैठक घेऊन सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम, मालेगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष अनिल अहिरे, कार्यवाह जयेश सावंत, शिक्षक परिषदेचे दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education officer s office locked by teachers unions zws
First published on: 21-05-2021 at 00:04 IST