कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

नाशिक : अल्प, मध्यम अणि दिर्घ मुदतीत विद्यापीठाच्या एकूणच कामकाजाची दिशा ठरवली जाणार आहे. आंतर विद्याशाखा संशोधनावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

 सोमवारी आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितिन करमळकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन डॉ. कानिटकर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. याप्रसंगी डॉ. कानिटकर यांनी आपल्या कारभाराची दिशा स्पष्ट केली. आरोग्य शिक्षण क्षेत्रात करोनाच्या काळात आलेल्या अडचणींची पुनरावृती होऊ नये यासाठी व्यापक प्रमाणात बदलाची गरज आहे. यासंदर्भात विषयतज्ज्ञ आणि त्या-त्या क्षेत्राशी निगडीत लोकांचा सल्ला आाणि मार्गदर्शनाने कार्याची वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असून त्या अनुषंगाने विशेष कार्य केले जाणार आहे. रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. आणि त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी  प्रभारी कुलगुरूपदाचा कारकीर्दीत आरोग्य शिक्षणाच्या विविध प्रशासकीय बाबींचा अभ्यास करता आला, असे सांगितले.