बुलढाणा: जिल्ह्यातील रोजगार हमी योजनांच्या कामावर जुलैमध्येही तब्बल पंधरा हजारांवर मजूर कार्यरत आहे. दुसरीकडे तब्बल दीड लक्ष हेक्टर क्षेत्रावरील खरिप पिकांच्या पेरण्या अजूनही रखडल्या आहे. आज अखेर झालेल्या अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे कृषिप्रधान जिल्ह्यात असे विचित्र आणि धक्कादायक चित्र आहे.

वार्षिक सरासरी ( ७६१.६ मिमी) पर्जन्यमानाच्या तुलनेत आज अखेर जिल्ह्यात २०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेरा तालुक्यापैकी जळगाव (२७४ मिलिमीटर), बुलढाणा (२३९ मिमी), लोणार (२४७मिमी), सिंदखेडराजा(२२२), देऊळगाव राजा (२०५ मिमी) या पाच तालुक्यात पावसाने द्विशतक ओलांडले आहे. मात्र तालुक्याच्या सरासरीच्या तुलनेत या पावसाची टक्केवारी २८ टक्के इतकीच आहे. उर्वरित चिखली, मेहकर, मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव या तालुक्यातील सरासरी यापेक्षा कमी आहे. यातही झालेला पाऊस मध्यम स्वरूपाचा असून अनियमित अंतराने झाला आहे. यामुळे आज़ ६ जुलै अखेरीसही तब्बल दीड लाख हेक्टरवरील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहे. यंदा कृषी विभागाने ७ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेऱ्याचे नियोजन केले आहे. यातही सर्वाधिक पेरा सोयाबीनचा राहणार आहे. अपुऱ्या पावसाने ६ जुलै अखेर ५ लाख ९० हजार हेक्टरवरच पेरा झाला आहे. अजूनही दीड लाख क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत.

हेही वाचा : आघाडीत बिघाडी होणार…? काँग्रेसकडून सर्व २८८ जागांवर…

टंचाई मुक्कामी

दरम्यान जुलै महिन्यातही पाणी टंचाईचा जिल्ह्यात ‘मुक्काम’ कायम आहे. सध्याही ६१ गावांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच २७९ गावांतील राहिवासीयांची तहान अधिग्रहित खासगी विहिरीद्वारे भागविली जात आहे. यापरिणामी जुलैच्या पहिल्या आठवड्यातही ३ लाख ग्रामस्थांचे बेहाल कायम आहे.

हेही वाचा : यवतमाळ : तब्बल एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘साठ हजार जणांची उपजीविका रोहयोवर

दरम्यान, अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पेरण्या रखडल्या आहे. यातही झालेल्या पेरण्या पाऊस, जमिनीतील ओल यावर अवलंबून राहत वेगवेगळ्या वेळी करण्यात आल्या. यामुळे शेतीची कामे नसल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांच्या संख्येत कमी झाली नाहीये. आज ६ जुलै रोजी कामावरील मजुरांची संख्या १५ हजार १२ इतकी आहे. यामुळे रोजगाराची तीव्रता स्पष्ट होते. चिखली, मलकापूर, मेहकर व लोणार या तालुक्यातील संख्या लक्षणीय आहे. मे महिना रोहयो कामांचा कळस ठरतो. या महिन्यात १५ ते १८ हजारांच्या दरम्यान राहते. यंदाच्या उन्हाळ्यात २३ मे रोजी सर्वाधिक म्हणजे १९ हजार मजुरांची।नोंद झाली होती. त्याखालोखाल १८ व १५ हजार अश्या नोंदी झाल्या. यंदा जुलै महिना लागला तरी १५ हजार मजूर कार्यरत आहे. हे मजूर आणि घरातील तीन सदस्य गृहीत धरले तरी किमान ६०हजार जणांची उपजीविका या कामामुळे भागविली जात आहे.