नाशिक : एक काळ गाजविलेली शहरातील एक पडदा चित्रपटगृहे, चित्रपटगृहांची जुनी तिकिटे, भित्तीचित्र, ध्वनिमुद्रिकांवरील आवरण असा सर्व खजिना नोव्हेंबरमध्ये शहरातील कुसुमाग्रज स्मारकात पाहता येणार आहे. अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती इटली येथील डी. मॉन्टफोर्ट विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. मोनिया अकारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय चित्रपटांच्या आवडीमुळे काही वर्षांपासून डाॅ. अकारिया सतत भारतात आणि नाशिकमध्ये येत आहेत. दादासाहेब फाळके यांच्यामुळे त्यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहे.
काळाच्या पोटात गडप होत चाललेली नाशिकमधील एकपडदा चित्रपटगृहे आणि त्यांचे या शहराशी असलेले नाते, या विषयावर त्यांचा अभ्यास सुरू आहे. चित्रपट, चित्रपटगृहांच्या जुन्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू त्या नाशिकमधील चित्रपटवेड्या लोकांकडून जमा करीत आहेत. सर्कल, अशोक, दामोदर, विजयानंद या जुन्या चित्रपटगृहांना भेट दिली. या चित्रपटगृहांमध्ये काम केलेल्या तत्कालीन कर्मचाऱ्यांचा त्यांनी शोध घेतला. त्यांच्या काम करतांनाच्या त्यावेळच्या आठवणी, अनुभव अशी माहिती ध्वनिमुद्रित केली. चित्रपटगृहांची जुनी तिकीटे, ध्वनिमुद्रिकांवरील आवरण हे सर्व त्यांनी शहरात अनेकांना भेटून जमा केले.
हेही वाचा : दर घसरल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव शेतकऱ्यांकडून बंद, महामार्गांवर आंदोलन
जुन्या काळात चित्रपटगृहांच्या दरवाज्यात तिकीट फाडून प्रेक्षकांना आतमध्ये सोडणाऱ्यांपासून (डोअरकिपर) त्यांना त्यांची खूर्ची दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यत अनेकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. हा सर्व माहितीचा खजिना नोव्हेंबरमध्ये खुला होणार आहे. नाशिकमध्ये भरविण्यात येणारे हे प्रदर्शन भेट देणाऱ्यांसाठीही अमूल्य ठरणार आहे. नाशिककरांकडे काही आठवणी, जुन्या वस्तू असतील तर त्यांनी इंडियन फिल्म अर्काइव्हज ॲट जीमेल डाॅट काॅम या संकेतस्थळावर संपर्क करावा, असे आवाहन डाॅ. अकारिया यांनी केले आहे.