scorecardresearch

‘कादवा’ची गाळप क्षमता विस्तारणार:सीएनजी, डेअरी प्रकल्पांचा विचार; कारखान्याच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे

दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा श्रीराम शेटे यांची तर, उपाध्यक्षपदी शिवाजी बस्ते यांची बिनविरोध निवड झाली.

(दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे आणि उपाध्यक्ष शिवाजी बस्ते यांचा सत्कार करताना रमेश भालेराव,अशोक भालेराव, रामभाऊ ढगे आदी)

वणी: दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा श्रीराम शेटे यांची तर, उपाध्यक्षपदी शिवाजी बस्ते यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढत असल्याने कादवा कारखान्याची गाळप क्षमता चार हजार मेट्रिक टन विस्तारली जाणार असल्याचे शेटय़े यांनी जाहीर केले. तसेच प्रस्तावित सीएनजी प्रकल्प अभ्यासांती हाती घेतला जाईल. ऊस उत्पादनास दुग्ध व्यवसायाची जोड मिळावी यासाठी डेअरी प्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कादवा सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक होऊन अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखालील कादवा विकास पॅनलने सर्व जागा जिंकत सत्ता कायम राखली. कारखाना सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निबंधक किरण गायकवाड यांचे उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी श्रीराम शेटे तर, उपाध्यक्ष पदासाठी शिवाजीराव बस्ते यांचे एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित संचालक मंडळाचा कादवा विकास पॅनल समिती, कादवा कामगार संघटना यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शेटे यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले. विरोधकांनी निवडणुकीत अपप्रचार करून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सभासदांनी संचालक मंडळाने गेली चौदा वर्ष प्रामाणिकपणे केलेल्या कामावर विश्वास दाखवला. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढत विस्तारीकरण केले. उसाला सातत्याने सर्वाधिक भाव दिला. इथेनॉल प्रकल्प हाती घेऊन कादवाचा विकास केला. या चांगल्या कामाची पावती म्हणून पुन्हा सत्ता दिली असून आमच्यावरील जबाबदारी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढत असून वेळेत ऊस तुटावे यासाठी तातडीने विस्तारीकरण करत गाळप चार हजार मेट्रिक टनपर्यंत वाढविण्यात येईल. तसेच सीएनजी प्रकल्प आणि डेअरी प्रकल्प उभा करत शेतकरी सभासदांचे हित साधले जाईल असे शेटे यांनी सांगितले. ऊस उत्पादकांनी गुजरात पध्दतीप्रमाणे कारखान्याकडे जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्या. जेणेकरून कारखान्यास कर्ज घ्यावे लागणार नाही. ठेवीदारांना ठेवीवर व्याज मिळेल आणि उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव देणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
इथेनॉल प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर
कादवा कारखान्याने १२५० मेट्रिक टन गाळप क्षमता दुप्पट म्हणजे अडीच हजार मेट्रिक टन केली आहे. कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढत आहे. वेळेत ऊस तोड व्हावी, यासाठी कमी दिवसात जास्त गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी तातडीने विस्तारीकरण करत कारखान्याची चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्यात येणार आहे. इथेनॉल प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. सीएनजी प्रकल्पाचा अभ्यास केला जाईल. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देण्यासाठी डेअरी प्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Expansion mud crushing capacity cng idea dairy projects shriram shete president factory indori taluka cooperative sugar factory amy

ताज्या बातम्या