नाशिक :  म्युकरमायकोसिसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार देण्याचे नियोजन केले आहे. या आजारावरील उपचारासाठी पाच ते सहा तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. अशा डॉक्टरांची उपलब्धता असणाऱ्या खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. नाशिक जिल्ह्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण आठ रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे २५९ रुग्ण आहेत. करोनापश्चात कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्या रुग्णांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एम्फोटरेसीन बी इंजेक्शनचा तुटवडा आहे. इंजेक्शन, औषधाचा खर्च अधिक असल्याने शासनाने या उपचाराचा जनआरोग्य योजनेत समावेश केला.

या आजारावरील उपचारात कान, नाक, घसा, नेत्ररोग, मेंदूविकार, प्लास्टिक सर्जरी करणारे आदी पाच ते सहा तज्ज्ञांची गरज भासते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांचा समावेश असला तरी सर्वच रुग्णालयांत म्युकरमायकोसिस उपचारासाठी आवश्यक असणारे पाच ते सहा तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात.

त्यामुळे अशा डॉक्टरांची उपलब्धता असणाऱ्या खासगी रुग्णालयातही म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे जाहीर करण्यात आले होते. जनआरोग्य योजनेंतर्गत आता जिल्ह्यातील या आजारावर उपचार करू शकणाऱ्या रुग्णालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या रुग्णालयात  उपचार होणार  डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (आडगाव), नामको विश्वस्त संस्थेचे कर्करोग रुग्णालय (पेठरोड), एसएमबीटी

संस्थेचे रुग्णालय (धामणगाव, इगतपुरी), सह्याद्री स्पेशालिटी (द्वारका चौक), सिक्स सिग्मा मेडीकेअर (महात्मानगर), वोक्हार्ट (वडाळा नाका) यासह जिल्हा शासकीय रुग्णालय (नाशिक) आणि शासकीय रुग्णालय (मालेगाव)  या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या उपचारार्थ व्यवस्था करण्यात आली आहे.