दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत चोरटय़ांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला.
पोलीस असल्याचे सांगून लूटमारीचे प्रकार याआधी झाले आहेत. अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले असले तरी नागरिक पुरेशी दक्षता बाळगत नसल्याने चोरटय़ांचे फावले आहे. इंदिरानगर येथील रहिवासी ओमप्रकाश सौंदाणकर व अरुण पुंडलिक हे नेहमीप्रमाणे जॉगिंग ट्रॅकवर भ्रमंतीसाठी गेले होते. तिथून परतत असताना सौंदाणकर यांचा दोन संशयितांनी पाठलाग केला. आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी आहोत, पुढे काही अज्ञात समाजकंटक चार लाखांची खंडणी वसूल करत आहेत. तुम्ही तुमचे दागिने सांभाळून ठेवा असे सांगत चोरटय़ांनी आपल्याजवळील पिशवी हाती देत त्यात दागिने जबरदस्तीने ठेवण्यास भाग पाडले. सौंदाणकर यांच्या बेसावधतेचा फायदा घेत त्यांच्याकडील दागिने चोरटय़ांनी लंपास केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली गावात असाच प्रकार घडला. काही कामासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करत दागिने पिशवीत ठेवण्यास सांगण्यात आले. दागिने ठेवण्याचा बहाणा करत संशयितांनी त्यातील अंगठय़ा व गंठन काढून घेतले. ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गायब केला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.