नाशिक : बलात्कार प्रकरणी दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्याबरोबर न्यायालयात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलीस नाईक तुषार बैरागी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. मंगळवारी आडगाव पोलीस ठाण्यातील हवालदारावर २० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई झाली होती. एकापाठोपाठ एक समोर आलेल्या या घटनांनी शहर पोलीस दलातील लाचखोरी चव्हाटय़ावर आली आहे.
तक्रारदाराविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोपपत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार, पोलीस नाईक तुषार बैरागी यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यात दोन्ही संशयितांना पैसे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. या विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र गिते, शरद हेंबाडे, अजय गरुड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
आदल्या दिवशी धनादेश अनादर प्रकरण मिटविण्यासाठी तसेच तक्रारदाराविरुद्ध व्याजाने पैसे दिले, अशी खोटी तक्रार न नोंदविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार राजेश थेटे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यास २४ तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यातील लाचखोरीचे प्रकरण समोर आले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला पकडण्यात आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.