निफाड तालुक्यातील महाजनपूरसह चितेगाव येथील चितळेश्वर, पिंपळस येथील मामलेश्वर, सुकेणे येथील गुरुदत्त उपसा जलसिंचन योजनांचे पाणी हक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. या संस्थांची पाणी परवानगी कालव्यात वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सर्व कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर लवकरच या गावांना हक्काचे पाणी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात मंत्रालयात आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने राज्यमंत्री शिवतारे यांच्या दालनात शेतकरी शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे उपसचिव कपोले, संगमनेरचे कार्यकारी अभियंता, नाशिकचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, उपअभियंता यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

तिन्ही गावच्या उपसा सिंचन संस्थांना तत्काळ त्यांचा पाणी वापराचा हक्क अबाधित करण्याचे निर्देश देत तसेच तालुक्यातील ज्या पाणी वापर बंद पडलेल्या संस्था आहेत. त्यांचा सखोल चौकशी अहवाल संबंधित पाटबंधारे विभागाकडून मागविण्याच्या सूचना राज्यमंत्र्यांनी केली.

चितेगावची चितळेश्वर, पिंपळसची मामलेश्वर आणि सुकेणे येथील गुरुदत्त उपसा सिंचन या योजनांविषयी मंत्रालयात याआधी बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सर्व क्षेत्राविषयी अहवाल परिपूर्ण नसल्याने या प्रकरणावर निर्णय होऊ शकला नसल्याने त्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने शिवतारे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.

पाणीवापर संस्थांच्या बाबतीत योजनानिहाय संबंध परिपूर्ण अहवाल पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे यांना सादर करण्याचे निर्देश शिवतारे यांनी दिले. तसेच सदर पाणीवापर संस्थांविषयी प्रथम पाण्याचा हक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता शिंदे यांना शिवतारे यांनी दिले.

तसेच महाजनपूर येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून पाणीवापर संस्था नोंदणी करून काही लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. उर्वरित योजना राबविण्यासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून सदर काम मार्गे करण्याविषयी शिवतारे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले. महाजनपूर येथील शेतकऱ्यांची १४४ हेक्टरला पाणी मिळण्याबाबतची मागणी तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश शिवतारे यांनी दिले. यावेळी संदीप टर्ले, रोहिदास कदम, किरण गाडे, बचवंत फड, संदीप फड आदींसह इतर शेतकरी उपस्थित होते.

१४४ हेक्टर क्षेत्राला हक्काचे पाणी मिळणार

आमदार कदम यांच्या पुढाकाराने महाजनपूर येथील शेतकऱ्यांसाठी कडवा कालव्याच्या पाण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे १४४ हेक्टर क्षेत्राला हक्काचे पाणी मिळणार आहे. निफाड तालुक्यातील कडवा कालव्यास सुमारे २० वर्षे झाली असली तरी पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची व्यथा शेतकऱ्यांनी बैठकीत शिवतारे यांच्यासमोर मांडली. पाटबंधारे विभागीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे १० टक्के पाणीवाटपाचा निर्णय उजेडात आला नाही. कडवा कालव्याच्या १०,९०० हेक्टरपैकी १० टक्के म्हणजे १०९० हेक्टर क्षेत्राला पाणी देणे शक्य आहे. महाजनपूर येथील शेतकऱ्यांना केवळ १४४ हेक्टरला पाणी हवे असल्याने शेतकऱ्यांची मागणी तत्काळ मान्य करून पाणी देण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला शिवतारे यांनी दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four villages soon to be entitled to water abn
First published on: 02-08-2019 at 14:25 IST