देवळालीत तोतया मेजर अटकेत

नाशिक : लष्करात मेजर असल्याची बतावणी करत तोफखाना केंद्र, देवळाली छावणी मुख्यालयात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला लष्कराच्या गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पवार (२६, हरसूल, चांदवड) असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील गुप्तचर विभागाकडून देण्यात आली. तोफखाना केंद्रात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत दलाल मोठय़ा प्रमाणात सक्रिय झाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. या दलालांमार्फत बेरोजगार युवकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी होत्या.

मारुती इर्टिगा वाहनातून मेजर अधिकारी देवळाली कॅम्प परिसरात फिरतो. भरतीसाठी आलेल्या मुलांना भेटतो. त्यांची कागदपत्रे जमा करून घेतो. या माहितीच्या आधारे लष्करी गुप्तचर विभागाच्या पथकाने संशयित वाहनावर नजर ठेवली. मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता संशयित वाहन देवळाली कॅम्प भागातील तोफखाना केंद्रात आल्याची माहिती मिळाली. प्रवेशद्वारावर वाहन रोखून चौकशी केली असता लष्करी गणवेशात तोतया अधिकारी गणेश पवार असल्याचे उघड झाले. चौकशीत संशयित पवार हा मेजर असल्याचा बनाव रचून बेरोजगारांना नोकरी लावून देतो असे सांगत फसवणूक करायचा. त्यासाठी तीन ते १५ लाख रुपयांपर्यंत रक्कम संशयिताने उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. देवळाली कॅम्प मुख्यालय व तोफखाना केंद्रात गट क मध्ये नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवत संशयिताने दिगंबर सोनवणे याच्याकडून पाच लाख, राजाराम शिंदेकडून चार लाख, नीलेश खैरेकडून तीन लाख, परशुराम आहेरकडून दीड लाख, वैभव खैरेकडून पाच लाख रुपये घेतल्याचे उघड झाले.

तसेच त्याच्या भ्रमणध्वनीत मेजर पदनामावलीची छायाचित्रे आणि स्टेशन हेडक्वॉर्टर देवळालीचा बनावट शिक्का वापरून बनवलेले चार्त्यि प्रमाणपत्र आणि सेवा प्रमाणपत्र सापडले. सदर कागदपत्रांचा वापर करून गणेश पवारने युनियन बँक ऑफ इंडियाच्या चांदवड शाखेकडून ३९ लाख रुपयांचे कर्जही घेतले होते. संशयिताने चांदवड येथून लष्कराच्या देवळाली मुख्यालयाचे शिक्के तयार केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे ३९ लाखांचे कर्ज

बेरोजगार युवकांकडून नोकरीसाठी लाखो रुपये उकळणारा तोतया लष्करी अधिकारी पवारच्या भ्रमणध्वनीत मेजर हुद्दा असणारे छायाचित्र, देवळाली मुख्यालयाचे बनावट शिक्के वापरून तयार केलेले चार्त्यि पडताळणी प्रमाणपत्र सापडले. या कागदपत्रांच्या आधारे संशयिताने चांदवड येथील युनियन बँक ऑफ इंडियामधून ३९ लाखांचे कर्ज घेतले आहे.