नाशिक: शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ कायम असून वेगवेगळय़ा भागात घडलेल्या दोन घटनांमध्ये चोरटय़ांनी सुमारे एक लाख रुपयांच्या सोन साखळय़ा चोरून नेल्या. दोन्ही घटनांमध्ये चोरटय़ांनी अगदी घराजवळ येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी खेचल्या. पहिली घटना पंचवटीतील बलरामनगर येथील अमृतकुंज बंगल्यासमोर घडली. याबाबत सारिका मुळे यांनी तक्रार दिली. त्यांच्या सासू अनिता मुळे या दुपारी आपल्या घरासमोर उभ्या असताना पल्सरवरून दोन संशयित आले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ येत गळय़ातील ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून नेली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना जेल रोडवरील ब्रम्हगिरी हौसिंग सोसायटीतील श्रीनिकेतन बंगल्यालगत घडली. याबाबत प्रदीप विश्वास यांनी तक्रार दिली. प्रदीप यांची आई रेखा विश्वास या दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घराच्या ओटय़ावर बसलेल्या असताना दोन जण मोटारसायकलने बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले. एकाने खाली उतरून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रेखा विश्वास यांना बोलावले. हाती कागद देऊन संशयिताने त्यांची ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून मोटारसायकलवरून पलायन केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपाययोजनांचा दुष्काळ

काही वर्षांपासून शहरातील वेगवेगळय़ा भागात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरू आहे. आजवर लाखोंचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. या घटना रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोलिसांमार्फत विविध भागात नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात असे. परंतु, अनेक महिन्यांपासून अशी मोहीम झालेली नाही. हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी आपली शक्ती पणाला लावली. परंतु, वाढत्या गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी तितके प्रयत्न होत नसल्याची सामान्यांची भावना आहे. मोटारसायकलवरील चोरटे आधी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करीत असत. आता ते थेट घराजवळ येऊन महिलांचे दागिने खेचून नेत असल्याने या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. महिलांनी पत्ता आणि तत्सम बहाण्याने संवाद साधू इच्छिणाऱ्यांपासून सतर्क राहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

पंचवटी पोलिसांचे आवाहन

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवर येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येऊन स्त्रियांचे गळय़ातील दागिने हिसकावून पळून जात आहेत. पंचवटीत अलीकडेच लक्ष्मीनगरात असा प्रकार घडला होता. त्यावेळी संबंधित महिलेच्या मुलाने दुचाकीवर पसार होणाऱ्या एकाला पकडण्याचा प्रयत्नही केला होता. अशा घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे. अशा अनोळखी व्यक्ती आपल्या परिसरात फिरताना दिसल्यास पंचवटी पोलीस ठाण्याशी ०२५३-२६२९९८३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी केले आहे.