साहित्य विश्वातील विविध मतप्रवाह.. आजवर लेखणीचा झालेला प्रवास..
शेलापागोटेच्या माध्यमातून शाब्दिक शालजोडी तर शहर परिसरातील सारस्वतांच्या पाठीवर सावानाने दिलेली प्रोत्साहनपर थाप.. पसायदानाचे मागणे.. अशा उत्साहपूर्ण वातावरणात सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्याची सांगता मु. श. औरंगाबादकर सभागृहात झाली. जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन डॉ. विद्यागौरी टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सायंकाळी काव्य संमेलनात जिल्ह्यातील नामवंत कवींनी सहभाग नोंदविला. रविवारी डॉ. टिळक यांच्या अध्यक्षीय भाषणाने सत्राची सुरुवात झाली. यावेळी साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रांविषयी डॉ. टिळक यांनी मत व्यक्त केले. लक्ष्मीबाई चारचौघींपेक्षा वेगळ्या होत्या, त्या काळातही इतराच्या धाकाला न जुमानता एक मांडल. मानसिक दडपणातून, स्वतंत्र विचार करण्याच्या वृत्तीतून त्या उलगडत राहिल्या. त्या बाहेर पडल्या. त्यांनी पांढरपेशा संकल्पनेला छेद देत शुचिर्भूततेच्या नव्या संकल्पना मांडल्या. त्यांनी जी मते मांडली ती आजच्या स्त्रीलाही धडे देत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ढासळती सामाजिक मूल्ये आणि साहित्य’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. अंजली पटवर्धन, डॉ. संजय साळवे, प्रा. डॉ. इंदिरा आठवले सहभागी झाले.

लोकशाहीत साहित्याला संपूर्ण मुक्तता मिळावी. साहित्यिकांना व्यक्त होऊ द्यावे, असा सूर उमटला. यानंतर डॉ. मीना प्रभू यांचा आजवरचा लेखन प्रवास या विषयावर वाचनालयाचे कार्याध्यक्ष मिलिंद जहागीरदार यांनी प्रकट मुलाखत घेतली. रंगकर्मी आनंद ढाकीफळे यांच्या उपस्थितीत शेला पागोटेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान, सावानातर्फे घेण्यात आलेल्या डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्काराने नितीन पाटील, वसंत खालकर, लक्ष्मीबाई बाल साहित्य पुरस्काराने सुधाताई डमरेंच्या १२ पथनाटय़ पुस्तकासाठी, ब. चिं.सहस्रबुद्धे साहित्य पुरस्काराने मुरलीधर खैरनार, जयश्री पाठक उत्कृष्ट काव्य पुरस्काराने जयश्री वाघ, कवी गोविंद काव्य पुरस्काराने विजय थोरात, पीयूष नाशिककर यांना सन्मानित करण्यात आले. विजय मेठे, किशोर पाठक, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, जयप्रकाश जातेगावकर, वैद्य एकनाथ कुलकर्णी यांच्यासह अन्य साहित्यिकांचा सन्मान झाला. पं.अविराज तायडे यांच्या संकल्पनेतील ‘स्वरताल अंतरंग’ कार्यक्रमाने मेळाव्याचा समारोप झाला.