सलग तीन ते चार आठवडय़ांपासून जाणवणाऱ्या टळटळीत उन्हामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी तापमानाने हंगामातील सर्वोच्च म्हणजे ३९ अंशाची पातळी गाठत मार्चमध्येच नाशिकचा पारा ४० अंशांचा टप्पा ओलांडणार असल्याची स्थिती निर्माण केली. उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. दुसरीकडे पाणी टंचाईचे संकटही गडद होत आहे.
महिनाभरापासून वर चढणाऱ्या तापमानाने मार्चच्या चवथ्या आठवडय़ात सर्वोच्च पातळी गाठली. आठवडाभरात तापमानात चार अंशांची वाढ होऊन गुरुवारी ते ३९ अंशांवर पोहोचल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये ही स्थिती असून धुळे, जळगाव व नंदुरबार भागातील वातावरण अधिक तापल्याचे दिसून येते. साधारणत: सकाळी ११ वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी चटके बसत असल्याने नागरिक घराबाहेर जाण्याचे टाळतात. त्याचा परिणाम बाजारपेठ व रस्त्यांवरील वर्दळ कमी होण्यात झाला आहे. उष्म्याला तोंड देणे अवघड होत असताना ग्रामीण भागात भारनियमनही सुरू असल्याने समस्येत आणखी भर पडली आहे. या घडामोडींमुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानाने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये याकरिता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वैद्यकीय तज्ज्ञांकडून केल्या जात आहेत.
उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी विविध मार्गही अनुसरण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर नेहमीप्रमाणे कंपन्यांनी विविध साधने बाजारात आणली आहेत. महागडय़ा वातानुकूलित यंत्रणा खरेदीसाठी योजना राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांत वातानुकूलित यंत्र, पंखे, थंडगार पाण्यासाठी माठ, खिडक्यांना पडद्याप्रमाणे बसविल्या जाणाऱ्या वाळा तत्सम साधनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली.
प्रमुख चौकांत शीतपेय, आइस्क्रीम पार्लर, रसवंती अशा दुकानांवर गर्दी वाढली आहे. रणरणत्या उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढण्यात झाला असून त्यामुळे बहुतांश धरणातील पातळी दोन ते तीन दशलक्ष घनफूटने कमी होत आहे. उष्णतेच्या लाटेत बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच जलसाठा कमी आहे, ती धरणे पूर्णत: कोरडी पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे पुढील महिन्यात पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.