नाशिक : करोनाचे सावट कायम असले तरी प्रशासनाने निर्बंध शिथील केल्याने बाजारपेठेत दीपोत्सवानिमित्त चैतन्य पसरले आहे. खरेदीसाठी प्रचंड उत्साह असून बाजारपेठेत गर्दीला उधाण आले आहे. करोनाविषयक नियमांचा पूर्णपणे विसर नागरिकांना पडला आहे.

सोमवारी रमा  एकादशीने दीपोत्सवाच्या पर्वाला प्रारंभ झाला असून यानिमित्ताने दुकाने सजली आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी आणि सोमवारीही बाजारपेठेतील गर्दी कायम होती. दीपोत्सवासाठी आकाशकंदील, पूजेचे सामान, कुंकू, लाह्या, बत्तासे, धने, केरसुणी आदी सामानासह रंगीत रांगोळी, सजावटीचे सामान घेण्यासाठी लोकांनी बाजारपेठेत गर्दी केली. काहींनी खरेदीचा मुहूर्त साधतांना इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची नोंदणी केली. दैनंदिन साहित्यासह  फराळ करावयाच्या सामानाच्या किंमती १० टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी करोनाचा प्रभाव कमी  झाल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे

गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाने शिरकाव केल्यापासून २० महिन्यात सर्वच सण, उत्सव भीतीच्या सावटाखाली आणि नियम  पाळून अत्यंत साधेपणाने गर्दी न करता साजरे करण्यात आले. आता मात्र करोना नियंत्रणात आल्याने आणि तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर झाल्याने दीपावलीच्या उत्साहाला उधाण आले आहे. सोमवारी वसुबारस निमित्त सामाजिक संस्थांच्या वतीने गाई-वासरांचे पूजन करण्यात आले. शहर परिसरातील गोसेवा संघाच्या गोठय़ांमध्ये वसुबारस पूजनानिमित्त महिलांनी गर्दी केली होती.

मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने अनेक रुग्णालयांनी फुलांची सजावट केली आहे.

धन्वंतरी पूजन

सध्या करोना असल्याने आरोग्य जपणे महत्वाचे आहे. धन्वंतरी पूजनातून आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी येथील सुशिला आयुर्वेदिक रिसर्च सेंटर अ‍ॅण्ड मेडिकल इन्स्टीटय़ुटच्या वतीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते धन्वंतरीची आरती करण्यात येणार आहे. यावेळी आयुर्वेदिक वनस्पतींची आरास करण्यात येणार आहे.  यामध्ये तुळस, कडुिलब, दालचिनी,आले, लसुण, मसाले, काळे मिरी, सुंठ, गुळवेल आदींचा वापर करण्यात येणार आहे.

एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी नाशिक येथील वल्र्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने दीपोत्सवा निमित्त सोमवारी एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी या संकल्पनेतून रामशेज किल्ल्यावर ५५१ दिवे लावत छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी झटणाऱ्या मावळय़ांच्या स्मरणार्थ दिवे लावण्यात आले. या निमत्ताने स्वच्छता करत गडपूजन, शिवव्याख्यान कार्यक्रम झाला.