धुळे : साड्या आणि इतर वस्त्रांच्या मालाच्याआडून गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा प्रकार धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या नाकाबंदी पथकाने कुसुंबा-मालेगाव रस्त्यावर उघडकीस आणला. याप्रकरणी चालक, सहचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मालमोटारीसह १० लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे यांचे मार्गदर्शन व सुचनेवरून पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विविध ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. या नाक्यांवर जिल्ह्यातून, दुसऱ्या जिल्ह्यात जा-ये करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त

रविवारी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळालेल्या माहितीवरुन सुरतहुन निघालेली मालमोटार कुसुंबामार्गे मालेगांवकडे जात असतांना धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजनाळे गावाच्या शिवारात कुसुंबा-मालेगांव रस्त्यावरील सीमावर्ती तपासणी नाक्यावर रात्री नऊ वाजता थांबविण्यात आली. पोलिसांनी चालक वाहिद पिंजारी, सहचालक शोएब खान (दोन्ही रा. मालेगांव, जि. नाशिक) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनीही मालमोटारीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा असल्याची माहिती दिली. निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक महादेव गुट्टे, हवालदार कुणाल पानपाटील, विशाल पाटील, कुणाल शिंगणे, धिरज सांगळे, रवींद्र राजपूत यांनी ही कारवाई केली. या कारवाईत साड्या व इतर मालाच्या आडोशाला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखूचा माल मिळून आला. संशयित दोघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीच्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.