नाशिक: ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जसे उत्स्फुर्तपणे मतदान होते, तसेच चित्र कांदा प्रश्नामुळे गाजलेल्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ग्रामीण भागात दिसले. या मतदारसंघात ६६.७५ टक्के मतदान झाले. शेतकरी, शेतमजुरांनी उन्हाचा तडाखा, रांगेत कराव्या लागणाऱ्या प्रतिक्षेचा विचार न करता उत्स्फुर्तपणे मतदान केल्यामुळे वाढीव मतदानाचा फटका कुणाला बसणार, याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ६०.७५ तर, धुळे मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक, दिंडोरी, धुळे मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली. मतदानाच्या दिवशी तापमान ४०.५ अंशावर पोहोचले होते. वळिवाचे सावट असतानाही मतदार मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. मतदानाची वेळ संपुष्टात येत असताना काही केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. यामुळे मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी गतवेळच्या तुलनेत वाढली. नाशिकमध्ये ही वाढ १.२२ टक्के, धुळ्यात साधारण चार टक्के तर दिंडोरीत टक्केवारीत १.०४ टक्क्यांची राहिली. नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे तर, धुळ्यात महायुतीचे डाॅ. सुभाष भामरे आणि मविआच्या डाॅ. शोभा बच्छाव यांच्यात लढत आहे. नाशिक आणि दिंडोरीतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदान झाल्याचे दिसून येते. त्यातही दिंडोरी मतदारसंघातील मोठ्या गावांपेक्षा अधिक मतदान गावोगावी झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होते. कांदा, द्राक्ष व अन्य कृषिमालाच्या विषयावरून शेतकरी वर्गात रोष आहे. मतदानात त्याचे प्रतिबिंब उमटल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : नाशिक : भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू ; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश

नाशिक लोकसभेत भाजपच्या प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात ग्रामीणच्या तुलनेत कमी मतदान झाले. देवळाली आणि सिन्नर या दोनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. या ठिकाणी तुलनेत अधिक मतदान झाले. मात्र, दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार याच भागातील असल्याने वाढीव मतदान नेमके कुणासाठी झाले, याची स्पष्टता निकालानंतर होईल. धुळे लोकसभा मतदार संघात ६०.२१ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. मागील निवडणुकीत ५६.६९ टक्के मतदान झाले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik at dindori lok sabha voter turnout at 66 75 percent css