नाशिक : मागील काही दिवसात जिल्ह्यातील आदिवासी तसेच डोंगर परिसरात वनविभागाच्या हद्दीत अनेक वणवे लागले. यामध्ये वनसंपदेची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. एकापाठोपाठ एक वणवे लागत असतानाही वन विभागाला त्याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. पर्यावरणप्रेमींकडून वारंवार हा विषय मांडण्यात येत असतानाह वन विभागाची भूमिका मात्र असवेदनशील आहे. वणवे पेटू नये यासाठी सातत्याने प्रबोधनावर भर देण्यात येत असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असतांना ठिकठिकाणी वणवे पेटू लागले आहेत. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात ब्रह्मगिरी, संतोषा-भांगरी डोंगर, नाशिकपासून काही अंतरावर असलेला रामशेज किल्ला, निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसर अशा सात ठिकाणी वणवे लागले.
सोमवारी रात्री त्यात पुन्हा भर पडली. सारूळच्या डोंगरावर वणवा पेटला. सारूळ-भांगरी येथे वणवा पसरत गेला. रात्री उशीरापर्यंत हा वणवा धगधगत राहिला. बेळगावढगा परिसरातील नागरिकांनी वणवा नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. वणव्यामुळे जंगलातील वनसंपदा जळाली.
अनेक ठिकाणी वणवे पेटण्यापेक्षा ते लावले जात असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. अपवाद वगळता बऱ्याचदा खाण माफिया, समाजकंटकांकडून डोंगर परिसरात आग लावली जात आहे. यामागे त्यांचे वैयक्तीक फायदे जास्त प्रमाणात असतात. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या वतीने सामाजिक वनीकरण अंतर्गत कोटय़ावधी वृक्षांची रोपे लावण्यात आली. वणवे लागण्यास त्याचे लेखापरीक्षणही कारणीभूत ठरत असल्याची शंका पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात वर्षभरात वाढलेली वणव्यांची संख्या या शंकेला बळकटी देत आहे.
जिल्हा परिसरात खाणकाम व्यावसायिकांना खाणी सुरू करण्यास येथील वनसंपदा अडचणीची ठरत आहे. दुसरीकडे, वणवे रोखण्यासाठी सातत्याने गस्त घालण्यात येत असून पत्रके, भित्तीपत्रके, फलक यातून प्रबोधन करण्यात येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
वनविभागाची मदतवाहिनी संपर्कहीन
वनविभागाच्या वतीने वणव्यांची माहिती देण्यासह नागरिकांच्या वेगवेगळय़ा अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी १९२६ ही मदतवाहिनी सुरू करण्यत आली आहे. मात्र या मदतवाहिनीवर तक्रारदारांकडून संपर्क साधला तरी संपर्क होत नाही. मदतीसाठी हा क्रमांक फिरवला तरी समोरून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे मदतवाहिनी अपयशी ठरली आहे.