कॅम्प परिसरात उमेदवारी निश्चित होण्याआधीच प्रचाराला सुरुवात

मालेगाव महापालिका निवडणूक

मालेगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारांची नावे निश्चित झाली नसताना दुसरीकडे आपणांस हमखास उमेदवारी मिळणार हे निश्चित धरून अनेक उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यात मालेगाव कॅम्प भागातील रहिवाशांच्या नातेवाईकांचे जाळे तालुक्यातील खेडय़ांमध्ये पसरलेले असल्याने संबंधित भागातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराची भिस्त प्रामुख्याने नातेवाईकांवरच ठेवली आहे.

महापालिकेच्या ८४ जागांसाठी २४ मे रोजी निवडणूक होत आहे. राज्यात अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भरघोस यश मिळविणाऱ्या भाजपने मालेगावच्या निवडणुकीतही वर्चस्व निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे.

[jwplayer sINoNicy]

भाजप आणि शिवसेना या पक्षांची मदार प्रामुख्याने मालेगाव कॅम्प परिसरावर आहे. या भागात काँग्रेससह इतर स्थानिक आघाडय़ांना फारसा प्रभाव नसल्याने या भागावर वर्चस्व मिळविण्यासाठी राज्यातील सत्तेत सहभागी असणाऱ्या दोनही पक्षांमध्ये निकराची लढाई आतापासूनच सुरू झाली आहे. पक्षांनी उमेदवार निश्चित केले नसले तरी काही इच्छुकांनी आपली उमेदवारी गृहीत धरत प्रचारही सुरू केला आहे. त्यात काही अपक्षांचाही समावेश आहे. मालेगाव कॅम्प परिसरातील मतदारांमध्ये मालेगाव आणि सटाणा तालुक्यातील नागरिकांचा अधिक समावेश आहे. ज्यांच्या नातेवाईकांचे जाळे अधिक त्या उमेदवाराला त्याचा प्रचारासाठी फायदा होत असल्याने राजकीय पक्षांकडूनही उमेदवारी निश्चित करताना त्याचा विचार केला जातो. इच्छुक काही उमेदवारांनी प्रचारही सुरू केला असून त्यासाठी परिसरातील ग्रामीण भागातील नातेवाईकांचा आधार घेतला जात आहे. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यावर अशा प्रकारच्या प्रचारास अधिक वेग येणार आहे. त्या वेळी ग्रामीण भागातून उमेदवारांच्या नातेवाईकांचे जत्थेच्या जत्थे मालेगाव कॅम्प परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. मागील निवडणूक प्रचारावेळी मालेगाव कॅम्प परिसरात एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेल्या उमेदवारांचे बरेचसे नातेवाईक एकमेकांना चांगल्या प्रकारे परिचित असल्याने प्रचार करताना त्यांची चांगलीच अडचण होते. आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या या पालिकेकडून नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा आतापर्यंत फोल ठरत आल्या आहेत. त्यामुळे सत्ता कोणाच्याही ताब्यात गेली तरी मालेगाव कॅम्प परिसरातील सोयी-सुविधांवर परिणाम होत नसल्याने मतदारांमध्ये निवडणुकीविषयी निरुत्साह दिसून येत आहे. त्यातच सध्या लग्नसराई सुरू असल्याने या भागातील बहुतेक जण लग्न तसेच सुटय़ांनिमित्त गावी गेल्याने इच्छुक उमेदवारांची प्रचार करताना गैरसोय होऊ लागली आहे.

भाजप आणि शिवसेनेत प्रमुख लढत

केंद्र व राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या या निवडणुकीत अधिक असली तरी अल्पसंख्याकांचे वर्चस्व असलेल्या या शहराने भाजपला जवळ केल्याचा इतिहास नाही. त्यामुळे स्थानिक पक्ष, आघाडी तसेच काँग्रेस यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. स्थानिक सामाजिक समीकरणामुळे मालेगाव महापालिका ताब्यात येण्याची सूतराम शक्यता नसल्याची जाणीव भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षांच्या नेत्यांना आहे. असे असले तरी पालिकेत सत्तेवर कोणाला बसवावे यासाठी या दोनही पक्षांच्या नगरसेवकांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरत आला आहे. मालेगाव कॅम्प परिसरात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्येच प्रामुख्याने लढत होण्याची चिन्हे असल्याने उमेदवारीसाठी या भागातून या पक्षांकडेच इच्छुकांची संख्याही अधिक आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे आणि भाजपकडून अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. महापालिकेच्या अल्पसंख्याक भागांमध्येही या दोनही पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात येत असले तरी त्यांना यश मिळण्याची शक्यता नसल्याने मालेगाव कॅम्प या भागातून आपल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी दोनही पक्षांचे नेते प्रयत्न करीत आहेत. निकालानंतर कोणत्याही एका पक्षास अथवा आघाडीस बहुमत न मिळाल्यास भाजप आणि शिवसेनेची भूमिका सत्तेवर कोणाला बसवावे यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.