नाशिक – इगतपुरी तालुक्यात महामार्गावर मुंढेगाव ते माणिखांब दरम्यान १८ जानेवारी रोजी सोने, चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करणाऱ्या कुरिअर वाहनावर पडलेल्या दरोड्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आग्रा येथून पाच गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात तीन माजी सैनिकांचा सहभाग आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि घोटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत २.५ किलो सोने आणि ४५ किलो चांदी असा पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या वाहनावरील चालक आणि दोन कामगार १८ जानेवारी रोजी मुंबईहून नाशिककडे सोने, चांदीचे दागिने घेवून जात असताना घोटीजवळील मुंढेगाव शिवारात वाहनावर दरोडा टाकण्यात आला होता. वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी तीन कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि घोटी पोलीस यांनी तपास सुरु केला होता.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये अमली पदार्थाची खरेदी, विक्री प्रकरणी पाच जण ताब्यात

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळांवरील पुरावे, तांत्रिक माहितीच्या आधारे दरोडेखोर उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील खेरागड, इटौरा परिसरात सलग तीन दिवस अहोरात्र पाळत ठेवत देवेंद्रसिंग उर्फ करवा परमार (३३, रा. नौनी), आकाश परमार (२२, रा. नौनी), हुबसिंग ठाकूर (४२, माजी सैनिक रा. चेंकोरा), शिवसिंग ठाकूर (४५, फळ व्यापारी, रा. नगला उद्यान रोड), जहीर खान (५२. माजी सैनिक, रा खेरागड) यांना पोलिसांनी आग्रा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सतेंदरसिंग यादव (माजी सैनिक, रा. भोजपूर), दालचंद गुर्जर (रा. नगला माधव) , नंदु गारे (चालक, रा. बहादुरी) यांच्यासह दरोडा टाकल्याची कबुली दिली.

यातील देवेंद्रसिंग हा सराईत गुन्हेगार असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. चोरलेले २.५ किलो सोने, ४५ किलो चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मुद्देमाल पोलिसांनी पाचही संशयितांकडून हस्तगत केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल अधीक्षक शहाजी उमाप यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

घोटीजवळ महामार्गावर मुंढेगाव ते माणिखांब दरम्यान १८ जानेवारी रोजी सोने, चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करणाऱ्या कुरिअर वाहनावर पडलेल्या दरोड्यात तीन कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांच्या दागिन्यांची लूट करण्यात आली होती. याप्रकरणी आग्रा येथून पाच गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात दोन माजी सैनिकांचा समावेश आहे.

कट असा रचला

दरोडा प्रकरणातील आकाश या संशयिताने यापूर्वी मुंबई येथील बजरंग कुरिअर सर्व्हिस या कंपनीत कुरिअर बॉय म्हणून काम केले होते. त्याला कंपनीच्या कुरिअर सेवेची सखोल माहिती होती. कुठले वाहन, कुठल्या शहरात कधी जाते, याची माहिती त्याला होती. गुन्ह्यातील मुख्य संशयित देवेंद्रसिंगने आकाशशी संपर्क साधत इतर साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा कट रचला. दरोडा टाकण्याआधी दोन दिवस अगोदर त्यांनी महामार्गाची टेहळणी करत ठरल्याप्रमाणे दरोडा टाकला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation of theft of gold silver vehicle nashik amy